कोकण दौऱ्यादरम्यान सिंधूदुर्ग, रत्नागिरीसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा


सिंधुदुर्ग – दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून ठाकरे यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजनेची घोषणा केली. दोन्ही जिल्ह्यांचा या योजनेतून सर्वांगिक विकास करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली.

सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी आढावा बैठका घेतल्या. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांनाही हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसीय कोकण दौऱ्या दरम्यान आपण अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. आंगणेवाडीच्या जत्रेलाही भेट दिली. त्याचबरोबर जिल्ह्याच्या बैठका सुरू आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे. आपण या बैठका मुंबईतही घेऊ शकतो, पण जिल्ह्याच्या ठिकाणी घेतल्यानंतर जनतेची वेगळी भावना तयार होते. आपल्याकडे देखील लक्ष असल्याचे लोकांना वाटते. त्याचबरोबर या बैठकांचा उपयोग अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी होत असल्यामुळे राज्यभर अशा बैठका सहा महिन्यांनी घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी कोकणमधील विकास कामासंदर्भात बोलताना नाणारविषयी भूमिका स्पष्ट केली. नाणार होणार नाही. शिवसेनेची जी भूमिका आहे. ती कायम आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Leave a Comment