५० हजार साप पकडणाऱ्या सुरेशला सर्पदंश


फोटो सौजन्य, मल्याळी मनोरमा
केरळ मधील प्रसिद्ध वन्यजीव संरक्षक वावा सुरेश यांना जहाल विषारी साप पकडत असताना त्या सापाने दंश केल्याने रुग्णालयात दाखल केले गेले आहे. त्यांना ७२ तास निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे असे समजते. सुरेश यांनी आजपर्यंत ५० हजाराहून अधिक सर्प पकडून त्यांना निसर्गात सुरक्षित सोडले आहे. विशेष म्हणजे या कामात त्यांना आत्तापर्यंत ३५०० साप चावले असून त्यातील ३५० तर विषारी होते असे त्यांना ओळखणारे जवळचे लोक सांगतात. सुरेश यांचे साप पकडलेले अनेक फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.

सुरेश पठनंथित्टा मध्ये एक अत्यंत विषारी साप पकडत होते. त्यांनी हा साप पकडला तेव्हा तेथे लोकांची एकच गर्दी झाली होती. पण तेवढ्यात या पिट वायपर जातीच्या अत्यंत विषारी सापाने सुरेश याना चावा घेतला व ते तत्काळ बेशुद्ध झाले. त्यांना तीरुवंतपुरम मधील रुग्णालयात दाखल केले गेले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ४६ वर्षीय सुरेश दक्षिणेतील प्रसिद्ध स्नेक कॅचर असून आत्तापर्यंत त्यांना अनेकदा साप नाग चावले आहेत. त्यामुळे त्याच्या शरीरात अँटीव्हेनोम उपचार विरोधी द्रव्य तयार झाले आहे. परिणामी त्यांना साप चावल्याचा फारसा त्रास होत नाही तरीही ७२ तास निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार केरळात ११० विविध प्रकारचे साप नाग सापडतात. भारतात दरवर्षी सरासरी २८ लाख लोकांना सर्पदंश होतात आणि त्यामुळे ४६ हजार मृत्यू होतात, ४ हजाराहून अधिक विकलांग होतात. तरीही सर्प दंशाचा नक्की आकडा सांगता येत नाही. याचे कारण या घटना बहुतेक ग्रामीण भागात घडतात आणि त्याचा रिपोर्ट केला जात नाही.

Leave a Comment