आगळेवेगळे कार फॉरेस्ट ऑफ द लास्ट चर्च


फोटो सौजन्य ग्लेनमेलिंग
जगभरात अनेक प्रकारची शेते आहेत आणि त्यात्या ठिकाणच्या हवामानाप्रमाणे तेथे पिके घेतली जातात हे आपण जाणतो. काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पिके अधिक चांगली येतात. नागपूर म्हटले की संत्री आठवतात तसेच आंबा म्हटले की कोकण आठवते. अमेरिकेच्या नेवाडा राज्यात मात्र एक आगळे वेगळे फार्म असून त्याचे नाव आहे इंटरनॅशनल कार फॉरेस्ट ऑफ द लास्ट चर्च. गोल्ड्फिल्डच्या पहाडी वाळवंटी भागात हे फार्म असून येथे विविध प्रकारच्या ४० हून अधिक गाड्या बॉनेट जमिनीत घुसवून उभ्या केलेल्या दिसतील.

मायकेल मार्क रीप्पी या व्यक्तीने ही कारची शेती २०११ मध्ये सुरु केली असून त्याला कॅड सॉर्ग या त्याच्या कलाकार मित्राची साथ मिळाली. लांबून पाहिल्यास या जागी कार्सचे जणू पिक आले असावे असे वाटते. त्यावर सुंदर लाईट्स, अतिशय सुंदर चित्रे रेखाटली गेली आहेत. या फार्ममध्ये कार्स, ट्रक, बस, व्हॅन अशी विविध प्रकारची वाहने आहेत.


गोल्डफिल्ड हा भाग पूर्वी सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध होता आणि गोल्डरश काळात येथील लोकसंख्या बरीच वाढली होती. आता मात्र येथील लोक स्थलांतर करून अन्यत्र गेले आहेत. त्यामुळे या गावात पाहण्यासारखे फारसे काही राहिलेले नसले तरी दोन बॉटल हाउसेस, एक झपाटलेले हॉटेल आणि हायस्कूल आहे तसेच हे आगळेवेगळे कार फार्मही आहे.

गावात शिरताच एक कच्चा रस्ता आपल्याला या कार फार्मवर घेऊन जातो. मायकेलला या अनोख्या कार फार्मची कल्पना सुचली तेव्हा त्याचा हेतू त्यानिमित्ताने स्वतःच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये करण्याचा होता असे सांगितले जाते. त्याचबरोबर कलाकार, आर्टिस्टनी येथे यावे आणि त्यांची मनपसंत कला कार्सवर रेखावी असाही उद्देश होता. आजही येथे या जुन्या वाहनानावर विविध प्रकारची सुंदर रंगीबेरंगी चित्रे रेखाटली जातात असे समजते.

Leave a Comment