बाजारात येणार ‘स्मार्ट ब्रेसलेट’, यासाठी होणार वापर

बाजारात स्मार्टफोन पासून ते स्मार्टवॉचपर्यंत अनेक गोष्टी आहेत. मात्र आता लवकरच बाजारात स्मार्ट ब्रेसलेट येणार आहे. शिकागो युनिवर्सिटीमधील कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक दांपत्य बेन झाओ आणि हीथर झेंग यांनी एक असे डिजिटल ब्रेसलेट तयार केले आहे, जे आजुबाजूच्या भागातील सर्व मायक्रोफोन पुर्णपणे ब्लॉक करू शकते.

बेन झाओ यांना अ‍ॅलेक्सा स्मार्ट स्पीकर खरेदी करायचा होता. मात्र त्यांच्या पत्नीला स्मार्ट स्पीकरच्या गोपनियता आणि सुरक्षेबद्दल समस्या होती. त्यांचे म्हणणे होते की, स्मार्ट स्पीकर युजर्सचे आवाज रेकॉर्ड करतात व याद्वारे खाजगी माहिती लीक होऊ शकते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी ब्रेसलेट बनविण्यात आले.

या दांपत्याने सहाय्यक प्राधाप्यक पेड्रो लोपेज यांच्यासोबत मिळून हे ब्रेसलेट तयार केले आहे. याचे नाव ‘ब्रेसलेट ऑफ सायलेन्स’ ठेवण्यात आलेले आहे. हे ब्रेसलेट घातलेल्या व्यक्तीचा आवाज स्मार्ट स्पीकरपर्यंत पोहचत नाही. सध्या या ब्रेसलेटला एक प्रोटोटाइप म्हणून सादर करण्यात आले असून, याची किंमत 20 डॉलर (जवळपास 1,428 रुपये) आहे.

या ब्रेसलेटमधील 24 स्पीकर अल्ट्रासोनिक सिग्नल पाठवतात. हे सिग्नल तुमचा आवाज स्मार्ट स्पीकर जसे की अ‍ॅलेक्सा आणि गुगलपर्यंत पोहचू देत नाही.

काही दिवसांपुर्वीच गुगल, अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅपल या कंपन्यावर आवाज रेकॉर्ड करण्याचे आरोप झाले होते. मात्र कंपन्यांनी हे रेकॉर्डिंग स्पीकरला अधिक चांगले बनविण्यासाठी करत असल्याचे सांगत आपली बाजू मांडली होती.

Leave a Comment