हवाई दल एचएएलकडून विकत घेणार ८३ ‘तेजस’ लढाऊ विमाने


नवी दिल्ली – देशांतर्गत संरक्षण क्षेत्रातील मोठा करार भारतीय हवाई दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) झाला असून एचएएलकडून सपोर्ट पॅकेजसह ८३ सिंगल सीटर तेजस लढाऊ विमाने हवाई दल विकत घेणार आहे. तत्पूर्वी ५६,५०० कोटी रुपये ८३ लढाऊ विमानांसाठी मोजावे लागणार होते. पण हा संपूर्ण व्यवहार आता ३९ हजार कोटी रुपयांमध्ये अंतिम झाला आहे.

ही किंमत वर्षभरातील चर्चेच्या वेगवेगळया फेऱ्यानंतर १७ हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. एचएएलने सुरुवातीला ८३ तेजस मार्क-१ए विमानांच्या निर्मितीसाठी जी किंमत सांगितली होती, संरक्षण मंत्रालय आणि भारतीय हवाई दलाला त्यामुळे धक्का बसला होता. आता अंतिम व्यवहार ३९ हजार कोटी रुपयांना निश्चित झाला असून, खरेदी संदर्भातील फाईल अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला पाठवण्यात येणार आहे.

या फाईलवर आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे ३१ मार्च पूर्वी मंजुरीची मोहोर उमटणे आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वप्रथम संरक्षण खरेदी परिषदेने ४९,७९७ कोटींना ८३ तेजस विमानांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली होती. पण एचएएलने त्यानंतर किंमत वाढवून ५६ हजार कोटी केली. सध्या भारतीय हवाई दलकडे ३० स्क्वाड्रन्स आहेत. चीन आणि पाकिस्तानचा एकाचवेळी मुकाबला करण्यासाठी ४२ स्क्वाड्रन्सची आवश्यकता आहे.

पहिली चार राफेल विमाने यावर्षी मे महिन्यात भारतात दाखल होतील. उर्वरित ३२ राफेल लढाऊ विमाने २०२२ पर्यंत टप्याटप्याने भारतीय हवाई दलात दाखल होतील. आयएएफच्या सुलूर येथील ‘फ्लाईंग डॅगर्स’ स्क्वाड्रनला आतापर्यंत ४० पैकी १६ तेजस मार्क-१ लढाऊ विमाने मिळाली आहेत.

Leave a Comment