जगातील सर्वात मोठ्या मैदानावर टीम इंडिया खेळणार डे-नाईट कसोटी सामना


नवी दिल्ली – पहिला डे-नाईट कसोटी सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ओळख होत असलेल्या अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याचे संकेत खुद्द बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहे. या विषयावर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सरदार पटेल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान पुढील वर्षी म्हणजे, २०२१ मध्ये या सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ डे-नाईट कसोटी सामना खेळणार असल्याचे ठरले आहे. बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी डे-नाईट कसोटीबाबतची माहिती दिली.

याबाबत माहिती देताना गांगुलीने सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात भारतीय संघ डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याचे ठिकाण लवकरच ठरवले जाईल. तसेच आगामी प्रत्येक कसोटी मालिकेत किमान एक सामना डे-नाईट खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.

कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर भारतीय संघाने नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या झालेल्या त्या सामन्यात सहज विजय मिळवला होता. दरम्यान अहमदाबाद येथील सरदार पटेल मोटेरा स्टेडियम तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आले आहे. या स्टेडियमची क्षमता १ लाख १० हजार एवढी आहे.

Leave a Comment