घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी शिक्षण व संपन्नता यासोबतच अहंकारही येत असल्यामुळे घटस्फोटाची प्रकरणे हल्लीच्या काळात सुशिक्षित व संपन्न कुटुंबांमध्ये अधिक आढळतात आणि त्याचा परिणाम कुटुंबे दुरावण्यात होतो, असे म्हटले होते. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने त्यांचे हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे ट्विट केले आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य कोणता विवेकी माणूस करतो, असा सवाल सोनमने केला आहे.

आजकाल मोठय़ा प्रमाणात घटस्फोटाची प्रकरणे वाढली असून किरकोळ कारणांवरून लोक भांडतात. घटस्फोटाची प्रकरणे सर्वाधिक सुशिक्षित व संपन्न कुटुंबांमध्ये आढळतात, कारण शिक्षण व संपन्नतेसोबत त्यांच्याकडे अहंकार देखील येतो. परिणामी कुटुंबे विभाजित होतात. यामुळे समाजही विभाजित होतो, कारण समाज हे देखील एक कुटुंबच असल्याचे भागवत म्हटल्याचे संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भागवतांचे हे वक्तव्य प्रतिगामी आणि हास्यास्पद असल्याची टीका सोनम कपूरने केली आहे.

समाजाची आजची अवस्था दोन हजार वर्षांपासून आम्ही पाळत असलेल्या परंपरांमुळे आल्याचे सांगताना भागवत म्हणाले की, महिलांना आपण घरापुरते बंदिस्त ठेवले आहे. अशी परिस्थिती दोन हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आमच्या समाजाचा सुवर्णकाळ होता. मी हिंदू आहे. मी सर्व धर्माशी संबंधित श्रद्धास्थानांचा आदर करतो, पण मी माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानाबाबत ठाम आहे. माझे संस्कार मला माझ्या कुटुंबाकडून मिळाले आहेत आणि ते आम्हाला मातृशक्ती शिकवते, याचाही भागवत यांनी यावेळी उल्लेख केला.

Leave a Comment