इंदुरीकरांनी ते वक्तव्य करायला नको होते – चंद्रकांत पाटील


मुंबई – राज्यात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या वक्तव्यावरून मागील दोन तीन दिवसांपासून वेगवेगळे मते मांडली जात आहे. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा राजकीय नेत्यांसह अनेकांनी निषेध केला. तर त्यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता भाजपनेही या सगळ्या वादविवाद आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात म्हटले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. या समितीच्या सदस्यांनी हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रात या आरोपानंतर वाद निर्माण झाला.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी पक्षाची भूमिका मांडली. पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, जनप्रबोधनासाठी इंदुरीकर महाराजांची कीर्तने असतात. पण, ‘ते’ वक्तव्य इंदुरीकरांनी करायला नको होते. इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. भाजप त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण, एखादी व्यक्ती एका वाक्याने खराब होत नाही. माणसाची तपश्चर्या एका वाक्यामुळे घालवू नका, असे आवाहन पाटील यांनी केले.

Leave a Comment