ए. आर. रहमानच्या मुलीचे तस्लिमा नसरीनला सणसणीत उत्तर


मुंबई : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीनने ट्विटरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानच्या मुलीवर निशाणा साधला होता. नसरीन यांनी सुशिक्षित लोक जेव्हा हिजाब घालतात मला तेव्हा गुदमरल्यासारखे होते. अशा आशयाचे ट्विट केले होते. रहमानची मुलगी खातिजाने त्यांच्या या ट्विटला सणसणीत उत्तर दिले आहे. खातिजाला गेल्या वर्षी देखील याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

ती समजुतदार आणि मोठी असल्याचे म्हणत तेव्हा वडील रहमानने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. पण याविषयावर आता खुद्द खातिजाने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, तुम्हाला जर माझा हिजाब पाहून गुदमरल्यासारखे होत असेल तर तुम्ही मोकळ्या हवेत या. तुम्हाला स्त्रीवाद हा मूळात कळलाच नाही, त्यासाठी तुम्ही संशोधन करा. स्त्रीवाद म्हणजे कोणत्याही महिलेचा अपमान करणे नाही. एकंदर त्यांना स्त्रीवाद म्हणजे नक्की काय? याचे संशोधन करण्याचा सल्ला खातिजाने दिला.

खातिजा पुढे म्हणाली, एक वर्ष देखील नाही झाले तोवर या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशात सध्या अनेक घटना घडत आहेत. पण या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा न करता एक महिला कोणते कपडे घालते यावर सर्वांचे लक्ष आहे. या विषयांवर जेव्हा चर्चा होते तेव्हा मला फार राग येत असल्याचे खातिजाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

एक फोटो लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट केला होता. त्यांनी यामध्ये म्हटले की, सुशिक्षित जेव्हा लोक हिजाब घालतात तेव्हा मला गुदमरल्यासारखे होते. तस्लिमाने ट्विट करून लिहिले की, ए आर रहमान यांचे संगीत मला खूप आवडते. पण जेव्हा मी त्यांच्या मुलीला बघते तेव्हा मला गुदमरल्यासारखे होते. पारंपरिक विचारांच्या कुटुंबात एक शिकलेली मुलगी कशापद्धतीने ब्रेनवॉश होऊ शकते.

Leave a Comment