ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची अशी आहे सुरक्षा


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पत्नी मेलेनियासह येत आहेत. ते प्रथम अहमदाबाद येथे जाणार असून पंतप्रधान मोदी यांच्या समवेत रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. ट्रम्प यांच्या सुरक्षेची पूर्ण तयारी झाली असून या ते ज्या मार्गावरून रोड शो करणार आहेत त्या २२ किमी मार्गाची तपासणी भारतीय पोलिसांनी केली आहेच पण अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस एजंटनी सुद्धा या मार्गाची आणि ट्रम्प जेथे जेथे जाणार आहेत त्या सर्व स्थळांची कडेकोट देखरेख केली आहे.

विमानतळ ते साबरमती आश्रम आणि तेथून मोटेरा स्टेडियम या मार्गावर २५ आयपीएस अधिकाऱ्यांची एक टीम तैनात आहे. त्याच्या मदतीला एनएसजीची अँटी स्नायपर टीम असून बॉम्बविरोधी पथकाने पूर्ण मार्ग अगोदरच चेक केला आहे. पोलीस उपायुक्त विजय पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार ६५ सहाय्यक आयुक्त, २०० इन्स्पेक्टर, ८०० उपनिरीक्षक यांच्यासोबत १० हजाराहून अधिक पोलीस तैनात केले गेले आहेत. या शिवाय अमेरिकन गुप्तचर विभाग व विशेष सुरक्षा अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

या कार्यक्रमासाठी जे पाहुणे आमंत्रित आहेत त्याची सर्व पार्श्वभूमी तपासली गेली असून हॉटेल मध्ये उतरलेल्या पाहुण्याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी एक खास सोफ्टवेअर वापरले जात आहे. स्टेडियम मध्ये १ लाख १० हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान ७ विमाने तयार ठेवली गेली आहेत. ट्रम्प त्यांच्या एअरफोर्स वन विमानातून येतील. दरम्यान कार्यक्रम होणार तेथे नो फ्लाईंग झोन जाहीर केला गेला असून हेलिकॉप्टर पेट्रोलिंग करणार आहेत. ट्रम्प यांच्या ताफ्यात १४ कार्स असून ते स्वतः त्यांच्या अति सुरक्षित बीस्ट मधून प्रवास करतील. या कारवर अणुहल्ला अथवा रसायनिक हल्ल्याचा कोणताही परिणाम होत नाही. ट्रम्प यांच्या सुरक्षेवर दोन दिवसात १० ते १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

Leave a Comment