असा आहे चविष्ट बर्गरचा इतिहास


फोटो सौजन्य युएसए टुडे
बर्गर हा मुळचा पाश्चिमात्य पदार्थ भारतात आता चांगलाच रुळला असून अबालवृद्ध आवडीने, मनापासून बर्गरचा आस्वाद घेताना दिसतात. बर्गर म्हटले की प्रथम नजरेसमोर येथे मॅकडोनल्ड. त्यांनी जगभरात बर्गर पोहोचविला आणि लोकप्रिय केला हे खरे असले तरी बर्गरचा इतिहास फार जुना आहे. म्हणजे अगदी पहिल्या शतकात त्याचे संदर्भ सापडतात. दोन हजार वर्षापूर्वी सुद्धा बर्गर खाल्ला जात होता आणि मंगोलीयन लोकही बर्गर खात होते अश्या नोंदी सापडतात.

द वर्ल्ड इज युवर बर्गर नावाच्या पुस्तकात बर्गरचा इतिहास दिला गेला आहे. त्यानुसार रोम मध्ये १ ल्या शतकात आयसीसीया ओमेंटास या नावाने बर्गर खाल्ला जात होता. हा बर्गर हॅमबर्गरशी मिळताजुळता होता. त्यात खिमा, काळी मिरी, बदाम आणि वाईन या पदार्थांचा वापर केला जात आहे.


१३ व्या आणि १४ व्या शतकात मंगोल साम्राज्यात दिवसभर घोडदौड करून आलेले राजे, सैनिक मासाचे तुकडे वापरून बर्गरसारखा पदार्थ सेवन करत असत. १७४७ मध्ये लंडन मध्ये तो हॅमबर्ग नावाने बनविला गेला. हा बर्गर बनविण्याची पद्धत तशीच राहिली होती पण त्यात काही पदार्थांची भर पडली होती. त्यात लसूण, जायफळ, रेड वाईनचा वापर सुरु झाला होता. टोस्टसह तो खाल्ला जात असे. १८०२ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीत हॅमबर्ग शब्द आला आणि त्याचा अर्थ होता, अशी डिश ज्यात मांस आणि त्याबरोबर कांदा व अन्य सामग्री वापरली जाते.


१८८५ मध्ये सँडविच रुपात द मेचेस ब्रदर्स यांनी न्युयॉर्कच्या एरी कौंटी मध्ये बर्गरची विक्री सुरु केली. त्यात डुकराचे मांस वापरले जात असे. अमेरिकेत विस्कोन्स्कीनमध्ये १९२५ मध्ये प्रथम लोणी किंवा चीज वापरून बर्गर बनविला गेला. १९४८ मध्ये कॅलिफोर्नियातील सॅन बर्नंडीनो येथे मॅकडोनल्ड भावांनी बर्गरविक्री सुरु करून जगभर मॅकडोनल्ड फास्टफूड चेन सुरु केली. १९५४ मध्ये बर्गर किंग मियामी मध्ये स्थापन झाली ती मॅकडोनल्डला स्पर्धा करण्यासाठी. आज बर्गर जगभरतील अनेक देशात विकला जातो आणि बर्गर विकणाऱ्या अनेक कंपन्या चांगला व्यवसाय करत आहेत.

Leave a Comment