पायांच्या भेगा नाहीशा करण्यासाठी…


आता हिवाळ्याची चाहूल लागत आहे. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, या समस्या उद्भवू लागतात. या साठी अनेक क्रीम्स आणि लोशन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. थंडीमध्ये चेहरा मुलायम दिसावा म्हणून हर तऱ्हेची क्रीम्स आपण बाजारातून आणून वापारत असतो. पण चेहऱ्याइतके लक्ष आपण आपल्या पायांकडे देत नाही. पायाला भेगा पडायला लागल्या की त्या भरून येण्यास वेळ लागतो. तसेच या भेगा जर खोलवर गेल्या तर त्यातून रक्त यायला लागते, आणि पायांच्या साध्या हालचालींनी देखील वेदना होऊ लागतात. त्यामुळे पायांच्या भेगांची समस्या उद्भवू नये या करिता घरच्याघरी उपाय करता येतील.

पायांना पडणाऱ्या भेगा भरून येण्याकरिता सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पेट्रोलियम जेली. हा उपाय करण्याकरिता रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून घेऊन कोरडे करून घ्या आणि त्यानंतर पावलांना पेट्रोलियम जेली लावा. त्यानंतर पायांवर मोजे घालून रात्रभर ठेवा. थंडीच्या दिवसांमध्ये पायांना भेगा पडत असतील तर बहुतांश वेळेला पायांवर मोजे ठेवावेत. जर सकाळच्या उन्हामध्ये काही वेळ बसणे शक्य असेल, तर उन्हामध्ये बसून पायांवर कोमट खोबरेल तेलाने मालिश करून परत मोजे घाला.

आठवड्यामध्ये एक दिवस पेडीक्युअर करावे. पेडीक्युअर करण्याकरिता ब्युटी पार्लरमध्ये जायलाच हवे असे नाही, घरच्याघरी देखील पेडीक्युअर करता येते. या करिता एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये आपल्याला सोसेल इतपत गरम पाणी घ्यावे. त्या पाण्यामध्ये थोडासा शँपू आणि थोडे मीठ घालावे. या गरम पाण्यामध्ये पावले काही वेळाकरिता बुडवून ठेवावीत. नंतर फूट स्क्रबर किंवा प्युमिस स्टोन ने पावले हळुवार गोलाकार घासावीत. त्यानंतर परत काही वेळ पाय गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत. पावले घासल्याने आणि गरम पाण्यातील मिठामुळे पावलांवरील त्वचेच्या मृत पेशी निघून जाऊन त्वचा मुलायम होते. पाच मिनिटांनी पावले गरम पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ पुसून कोरडी करा. त्यानंतर पावलांवर पेट्रोलियम जेली लावून मोजे घालावे.

जर पावलांना खोल भेगा पडल्या असतील, तर रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत, व त्यानंतर भेगांना वितळलेले मेन लावावे. मेणामुळे खोल भेगा लवकर भरून येण्यास मदत मिळते. दररोज पायमोजे घालणे शक्य नसेल, तर दिवसातून दोन वेळा पायाच्या भेगांना मोहोरीचे किंवा खोबरेल तेल लावून मालिश करावी. त्याने पावले नरम राहून भेगा कमी होतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment