या देशामध्ये घटस्फोट घेणे अपराधासमान.. !


या देशामध्ये विवाहबंधनात अडकणे सोपे आहे, पण विवाहबंधनातून बाहेर पडणे महाकठीण..! काही दशके आधी, विवाहबंधन हे दोन जीवनांना पूर्णत्व देणारे बंधन समजले जात असे. त्यामुळे कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यांचा एकत्रितपणे सामना करणे, किंवा एकत्रित जीवनासाठी आवश्यक त्या तडजोडी करणे यासाठी जोडप्यांची सदैव तयारी असे. पण आता काळ बदलला, तशी लोकांची विचारसरणी बदलली. आता एकमेकांसाठी तडजोडी करण्यापेक्षा आपापले मार्ग निवडून वेगळे होण्याकडे कल वाढलेला पहावयास मिळतो आहे. नव्याने आलेले हे सामाजिक परिवर्तन ध्यानी घेऊन काही देशांनी घटस्फोटाच्या कायद्यांमधील किचकटपणा कमी केला आहे. इतकेच नव्हे तर घटस्फोटाची प्रक्रिया हे अधिक वेगवान गतीने पूर्ण होण्यास सहायक कायदे अनेक देशांनी अस्तित्वात आणले आहेत. हे सामाजिक बदल जवळजवळ सर्व देशांनी स्वीकारले असले, तरी एक देश मात्र असा आहे, जिथे घटस्फोट घेणे अजूनही मान्य केले जात नाही. हा देश म्हणजे फिलिपिन्स.

जेव्हा फिलिपिन्स वर स्पॅनिशांचे अधिपत्य होते, तेव्हा चर्च, धर्म या गोष्टींना अधिक मान्यता होती. किंबहुना चर्चतर्फे घेतले जाणारे सामाजिक, राजकीय निर्णय सर्वमान्य होत असत. फिलिपिन्स स्वतंत्र झाल्यांनंतर कायद्याने चर्च आणि राजकीय सत्ता वेगळे झाले असले, तरी अजूनही कॅथॉलीसिझम चा पगडा फिलिपिन्स मध्ये जबरदस्त आहे. कॅथॉलीसिझम मध्ये घटस्फोट हा धर्माने अमान्य करण्यात आला आहे, त्यामुळे आज ही घटस्फोटाला येथे सामाजिक मान्यता नाही. चर्च च्या म्हणण्यानुसार विवाहबंधन हे एक पवित्र बंधन असून, हे बंधन तोडण्याचा विचार करणे पाप समजले जाते. आधुनिक विचारसरणीच्या अनेक नेत्यांनी घटस्फोटाचे नवीन कायदे फिलिपिन्स मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण प्राचीन संस्कृती आणि परंपरांचे पुरस्कर्ते असलेल्या राजकीय नेत्यांनी हे प्रयत्न हाणून पाडले.

फिलिपिन्समध्ये घटस्फोट घेता येत नसला, तरी पती पत्नींनी वेगेळ होण्याला मात्र कायद्याने मंजुरी दिलेली आहे. परस्परांमध्ये असामंजस्य, शारीरिक छळ, ड्रग्स चे सेवन इत्यादी कारणांवरून पती पत्नींना वेगळे होण्याची अनुमती दिली गेली आहे. पण कायद्याच्या दृष्टीने मात्र वेगळे झालेले जोडपेही विवाहितच समजले जाते. त्यामुळे वेगळे झाल्यानंतर पुनर्विवाह करण्याची परवानगी जोडप्यांना दिली जात नाही.

जर घटस्फोट घेणे अटळ असेल, तर मात्र घटस्फोट घेण्यास इच्छुक जोडप्याला अतिशय क्लिष्ट कायद्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीचा वारेमाप खर्च होतो. तसेच घटस्फोट घेण्याला सामाजिक मान्यता नसल्याने ‘ लोक काय म्हणतील ‘ याचा विचारही घटस्फोट न घेण्यामागे असतो. घटस्फोटीत महिला किंवा पुरुष याला सर्वच बाबतीत समाजिक अवहेलना सहन करावी लागते. नातेवाईक, आप्तेष्ट, नोकरीच्या ठिकाणी अश्या व्यक्तीशी संबंध तोडण्याची प्रवृत्ती अधिक दिसते.

Leave a Comment