आपल्या किंमती साड्यांची देखभाल कशी कराल?


आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. आपल्या पैकी सर्वांनाच लग्नाची आमंत्रणे येत असतात. या निमित्ताने आपण आपले खास ठेवणीतले कपडे या विशेष प्रसंगांसाठी काढत असतो. स्त्रियांसाठी तर हा मोका अगदी विशेष असतो. भरजरी साड्या, मूल्यवान दागिने हा सर्व जामानिमा करण्यात स्त्रीवर्ग गुंगून जातो. अश्या प्रसंगांच्या निमित्ताने महिला विकत घेत असलेल्या साड्या किंमती, आणि भरजरी असतात. त्यामुळे जर त्या साड्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही, तर त्या साड्यांची रया जाऊन त्या साड्या लवकरच जुनाट दिसावयास लागतात. त्याउलट किंमती, भरजरी साड्यांची जर योग्य काळजी घेतली तर त्या वर्षानुवर्ष नव्याप्रमाणे रहातात. अश्या सुंदर साड्या वापरणे, पुढील पिढीतील लेकी-सुना देखील आवर्जून पसंत करतात.

आपल्या किंमती, भरजरी साड्या आपल्या नेहमीच्या वापरातील साड्यांपेक्षा वेगळ्या ठेवाव्यात. साड्या ठेवण्यासाठी जी खास कव्हर किंवा साडी बॉक्स बाजारामध्ये मिळतात, त्यांचा वापर या साड्या ठेवण्यासाठी करावा. तसेच या साड्या कोरड्या व कमी प्रकाशाच्या ठिकाणी ठेवायला हव्या. खरे तर या साड्या वापरल्यानंतर त्यांना ड्राय क्लीन करायला हवे, पण जर आसपास चांगला ड्राय क्लीनर उपलब्ध नसेल, तर या साड्या घरच्याघरी सौम्य डीटर्जन्टचा वापर करून थंड पाण्यामध्ये धुवाव्यात. ‘ इझी ‘ सारख्या उत्पादनांचा अश्या वेळी वापर करावा. साडी ड्राय क्लीनरकडे पाठविताना साडीवरील ब्लाऊजही ड्राय क्लीन करावयाला विसरू नये.

समारंभाच्या प्रसंगी आपल्या किंमती साडीवर कोणतेही डाग पडणार नाहीत याची काळजी घ्या. पण काही वेळा घाई गडबडीत आपल्या हातून किंवा कुणाचा तरी धक्का लागून साडीवर काहीतरी सांडून डाग पडतो, किंवा हळद-कुंकवाचे डाग पडतात. अश्या वेळी साडी ड्राय क्लीनर कडे पाठविण्यावाचून पर्याय नसतो. पण हे डाग घरच्याघरी पेट्रोलचा वापर करून काढता येतात. तसेच एखादे सौम्य डीटर्जन्ट आणि प्रोटीन स्टेन रीमुव्हर वापरूनही हे डाग काढता येऊ शकतात. याच्या वापराने ज्यूस, चहा, आईस्क्रीम सारखे डाग साडीवरून निघण्यास मदत होते.

या साड्या धुताना कपड्यांच्या ब्रशचा वापर अजिबात करू नये, कारण या साड्यांचे धागे अतिशय नाजूक असतात, व ब्रशच्या वापराने साडीचा कपडा किंवा रेशीम खराब होऊ शकते, किंवा फाटू शकते. तसेच या साड्यांना इस्त्री करताना त्यावर एक पातळ सुती कपडा ठेऊन इस्त्री फिरवावी. जर इस्त्री थेट साडीवरच ठेवली, तर इस्त्रीच्या गरमीने साडीचे नाजूक रेशीम जळण्याची शक्यता असते. इस्त्री करताना इस्त्री फार जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यावी.

साड्या कपाटामध्ये किंवा साडी बॉक्स मध्ये ठेवताना त्यामध्ये डांबराच्या गोळ्या किंवा कडूनिंबाची पाने ठेवावीत. डांबराच्या गोळ्या ठेवताना त्या थेट साडीवर न ठेवता, एखाद्या तलम कपड्यामध्ये बांधून, त्याची पुरचुंडी बांधून ठेवावी. काही किंमती साड्या फार दिवस वापरल्या गेल्या नाहीत, तर त्या, जिथे साडीची घडी पडते, तिथून चिरण्याची शक्यता असते. त्यामुळे साड्या वापरल्या जात नसल्या तर अधून मधून त्या काढून त्यांच्या घड्या बदलाव्यात.

Leave a Comment