इंदुरीकरांची आयोजकांना सुचना; जोपर्यंत कॅमेरे काढत नाही, तोपर्यंत सुरू होणार नाही कीर्तन


अहमदनगर – खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच भिंगार येथे कीर्तनासाठी वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदुरीकर महाराज देशमुख आले होते. विशेष म्हणजे त्यांचे कीर्तन सुरू असतानाचे चित्रिकरण करण्यासही बंदी घालण्यात आली होती. इंदुरीकर महाराज समतिथीला मुलगा व विषम तिथीला मुलगी, असे वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच भिंगार येथे श्रीशुक्लेश्वर मंदिरात शनिवारी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. खासगी ‘बाउंसर’च्या सुरक्षेची व्यवस्था इंदुरीकर महाराजांसाठी तैनात करण्यात आली होती. त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

सुरक्षा रक्षकांनी इंदुरीकर गाडीतून उतरताच त्यांच्याभोवती सुरक्षा कडे केले. त्यांना त्या सुरक्षेतच कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यापूर्वी आयोजकांनी कीर्तनाची शुटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले. हे कॅमेरे जोपर्यंत काढण्यात येणार नाही, तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही, अशी सूचनाही आयोजकांनी दिली. अखेर कॅमेरे काढल्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरू करण्यात आले. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याच्या क्लिप टिकटॉकसह विविध सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या क्लिपवरही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Comment