
औरंगाबाद – कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीनगर करतील, अशी माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली होती. एमआयएमतर्फे त्यावर टीका करण्यात आली आहे. एकच मुद्दा घेऊन मागील तीस वर्षांपासून बसले आहेत, त्यापेक्षा औरंगाबादच्या विकासाबाबत बोला, अशी टोलेबाजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
आधी औरंगाबादचे प्रश्न सोडवा, त्यानंतर आम्ही देखील नाव बदलण्यात मदत करु
औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा असून या शहराची ओळख आता पुसत चालली आहे. कचरा आणि खड्ड्यांचे शहर म्हणून शहराला ओळख मिळत आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून शहराचे नाव बदलण्याची भाषा करत आहे. देशात ज्या शहरांची नावे बदलली त्या शहरांचा विकास किती झाला हे तपासा, शहराचे बदललेले नाव नागरिकांना नको आहे. शहराचे काय?, कचरा कधी स्वच्छ होणार?, शहरासाठी जाहीर केलेली पाण्याची योजना कधी पूर्ण होणार? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत. महाराजांचे नाव बकाल झालेल्या शहराला देण्यापेक्षा आधी शहराचा विकास करा मग नाव बदलण्याचा विचार करा. फाईल आम्ही स्वतः घेऊन जाऊ, असे म्हणत एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका केली.
