दिल्लीतील 52 आमदार कोट्याधीश, सर्वात श्रींमत ‘आप’चा आमदार

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडेच ठेवली आहे. मात्र यंदा दिल्लीतील विधानसभेत कोट्याधीश आमदारांची संख्या देखील वाढली आहे.

वर्ष 2015 मध्ये 44 कोट्याधीश आमदार (63 टक्के) निवडून आले होते. तर यंदा 52 कोट्याधीश आमदार (74 टक्के) निवडून आले आहेत. सर्वात श्रींमत आमदार आपचा असून, त्याची संपत्ती 292 कोटी आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार, आम आदमी पक्षाच्या 62 पैकी 42 आमदार कोट्याधीश आहेत. तर भाजपचे 8 पैकी 7 आमदार कोट्याधीश आहेत.

70 पैकी 25 आमदारांची संपत्ती 5 कोटींपेक्षा अधिक आहे. 13 आमदारांची 2 ते 5 कोटी, 20 आमदारांची 50 लाख ते 2 कोटी, 11 आमदारांची 10 ते 50 लाख आणि एका आमदाराची संपत्ती 10 लाखांपेक्षा कमी आहे. दिल्ली विधानसभेत जिंकून आलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती 14.29 कोटी रुपये आहे. तर 2015 मध्ये निवडून आलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती 6.29 कोटी रुपये होती.

यंदा आपचे 62 आमदार जिंकून आले असून, त्यांची सरासरी संपत्ती 14.96 कोटी आहे. तर भाजपच्या 8 आमदारांची सरासरी संपत्ती 9.10 कोटी रुपये आहे.

आपचे आमदार धर्मपाल लकडा यांची संपत्ती 292 कोटी रुपये आहे. तर आपचेच आमदार परमिला टोकस यांची संपत्ती 80 कोटी आणि राज कुमार आनंद यांची संपत्ती 78 कोटी रुपये आहे. सर्वात कमी संपत्ती असणारे आमदार देखील आपचेच असून, राखी बिरला यांची संपत्ती 76 हजार रुपये आहे. संजीव झा 10 लाख रुपये आणि सोम दत्त यांची संपत्ती 11 लाख रुपये आहे.

या व्यतरिक्त 70 पैकी 19 आमदार असे आहेत, ज्यांच्यावर 50 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहेत. यात आपचे आमदार राज कुमार आनंद यांच्यावर 32 कोटी रुपये, राज कुमारी ढिल्लो 19 कोटी रुपये आणि करतार सिंह तंवर यांच्यावर 12 कोटी रुपये कर्ज आहे.

Leave a Comment