शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची? – पंकजा मुंडे


अमरावती – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात आली. शिक्षकांकडून मुलींना ही शपथ सद्यपरिस्थितीत मुलींवर होणारे अत्याचार, अ‌ॅसिड हल्ले पाहता देण्यात आली होती. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विट करून मुलींऐवजी मुलांनीच शपथ घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी या घटनेसंदर्भात त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अ‌ॅसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने मुलींकडे बघणार नाही आणि जर कोणी बघितले तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असे ट्विट केले आहे. या प्रकाराबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची?

टेंभुर्णी गावात महिला कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुलींनी या शिबिरात अशी शपथ घेतली. हा उपक्रम प्राध्यापक प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर दंदे यांनी भाषण केले होते.

Leave a Comment