अशी आहे शाही परिवाराची शाही ट्रेन


ब्रिटनची राणी एलिझाबेथ, प्रिन्स फिलीप आणि इतर शाही परिवारासाठी खास तयार केल्या गेलेल्या ट्रेनचे वर्णन ‘ बकिंगहॅम पॅलेस ऑन व्हील्स ‘ असे केले जाते. ह्या ट्रेन मध्ये शाही परिवाराच्या प्रत्येक गरजेची खास काळजी घेतली गेली असून, एखाद्या राजमहालाप्रमाणेच सर्व सुखसोयी या ट्रेनमध्ये पुरविल्या गेल्या आहेत. ह्या ट्रेनचे निर्माण १८४२ साली करण्यात आले होते. खुद्द ब्रिटनची राणी किंवा शाही परिवारजन प्रवास करीत असताना त्यांना प्रवासादरम्यान सर्व सोयी मिळाव्यात या उद्देशाने ही ट्रेन तयार करण्यात आली होती. आता जवळजवळ दीडशे वर्षे उलटून गेली असली, तरी आज ही ट्रेन अतिशय आलिशान आणि सर्व आधुनिक सोयींनी परिपूर्ण म्हणून ओळखली जाते.

१८४० च्या दशकात, राणी व्हिक्टोरियाला शाही रथातून प्रवास करणे तितकेसे पसंत नसल्याने या ट्रेनचे निर्माण करण्यात आले. या ट्रेनमध्ये खास राणी करिता तयार करण्यात आलेल्या ‘ सूट ‘ मध्ये निळ्या रंगाचा वापर तेथील सोफा, खुर्च्या यांवरील आच्छादनांसाठी करण्यात आला. तसेच तेथील खिडक्यांवर उत्तम प्रतीच्या रेशमी कपड्याने बनविलेले पडदे लावण्यात येऊन, तेथील इतर सजावटीच्या वस्तू सोन्याच्या होत्या. ही सजावट आजतागायत कायम असून, त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडेफार बदल करण्यात आले आहेत.

ब्रिटनचे राजे सातवे एडवर्ड यांनी या ट्रेनमध्ये दैनंदिन कारभार आणि पत्रव्यवहारासाठी एक प्रशस्त ऑफिस तयार करून घेतले. तसेच त्यांनी आराम करण्याकरिता एक खासगी कक्ष देखील तयार करवून घेतला. या ट्रेनमध्ये एडवर्ड यांनी ‘ स्मोकिंग रूम ‘ ही तयार करविली. पाश्चिमात्य देशांमध्ये संध्याकाळच्या वेळी, विशेषतः रात्रीचे जेवण आटोपले, की धूम्रपान आणि मद्यपान करीत व्यवसायाशी निगडीत किंव अवांतर चर्चा करण्यासाठी पुरुष मंडळी या ‘ स्मोकिंग रूम ‘ चा वापर करीत असत. ही पद्धत आज ही काही ठिकाणी पहावयास मिळते. या शाही ट्रेनमधील स्मोकिंग रूम अतिशय प्रशस्त असून, येथील सोफे, टेबले आणि ‘बार काऊंटर’ उत्तम प्रतीचे लाकूड आणि चामडे वापरून तयार केले आहेत.

राणी व्हिक्टोरिया आणि राजे एडवर्ड यांना या ट्रेनने प्रवास करणे अतिशय आवडत असल्याने येथील सर्व सोयींकडे त्यांनी अगदी बारकाईने लक्ष पुरविले. ट्रेनमधील इतर कक्षांप्रमाने डायनिंग रूमही अतिशय काटेकोरपणे, प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करून तयार करण्यात आली आहे. या डायनिंग रुममध्ये एका वेळी बारा व्यक्ती भोजन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आता या ट्रेनमध्ये राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांची स्नानगृहे देखील आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहेत. राणीच्या स्नानगृहामध्ये प्रशस्त बाथटब असून, प्रिन्स फिलीप यांचे स्नानगृह अद्ययावत शॉवर सिस्टम वापरून तयार करण्यात आले आहे. प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांचे स्वतंत्र शयनकक्ष असून, त्या दोघांची ऑफिसेसही स्वतंत्र आहेत. तसेच मिटींग्स किंवा इतर चर्चांसाठी अद्ययावत बोर्डरूम्स देखील या ट्रेनमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

ह्या ट्रेनला एकूण नऊ कोचेस असून, राणी किंवा शाही परिवारातील सदस्य या ट्रेनने प्रवास करीत असताना एकूण दीडशे सेवकांची फौज इथे तैनात असते. त्यांना राहण्यासाठी स्टाफ क्वार्टर्स देखील या ट्रेनमध्ये उपलब्ध आहेत. राणी किंवा इतर शाही परिवार राजमहालात असोत, किंवा ट्रेनमध्ये असोत, त्यांना सर्व सोयी नेहमीप्रमाणेच मिळाव्यात याची खबरदारी घेण्यासाठी हा स्टाफ सदैव सज्ज असतो.

Leave a Comment