ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर यांचे निधन


मुंबई : आज दुपारी 12 वाजता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर यांचे निधन झाले. राहत्या घरी 90 वर्षीय राजा मयेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

तब्बल 60 वर्ष अभिनयाचे क्षेत्र ‘लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणा-या मयेकर यांनी गाजवले. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील ‘गप्पागोष्टी’ ही त्यांची मालिका त्याकाऴी प्रचंड गाजली होती.

त्यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले होते. राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास दशावतारी नाटकापासून सुरू झाला होता. ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’ आणि ‘असुनी खास घरचा मालक’ ही तीन लोकनाटय तुफान गाजली होती. शिवाय ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे राजा मयेकर यांचे अभिनयात पहिले पाऊल पडले. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना याचा उल्लेख ते नेहमीच करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Comment