पन्नास हजार लोकांना दररोज जेवू घालणारा सुवर्ण मंदिराचा ‘लंगर‘


शिख धर्माचे पहिले धर्मगुरू गुरु नानक साहेब यांनी १४८१ साली ‘ लंगर ‘ च्या परंपरेची सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत अमृतसर येथील शिख धर्माचे प्रमुख प्रार्थनास्थळ मानल्या गेलेल्या सुवर्ण मंदिरामध्ये लंगरची परंपरा अखंड सुरु आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म, जात, त्याची सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती याची विचारणा न करता अन्नदानाचे काम अहोरात्र सुरु असते. येथे आलेला याचक कोणीही असो, तो उपाशीपोटी कधीच परत जात नाही.

सर्वच गुरुद्वारांमध्ये मोफत अन्नदान, म्हणजे लंगर चालत असतात, पण अमृतसर मधील सुवर्ण मंदिरातील लंगराला विशेष महत्व आहे. या लंगरमध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ साधेच पण चविष्ट तर असतातच, पण ह्या लंगरमध्ये दररोज जेऊ घातल्या जाणाऱ्या माणसांचा नुसता आकडा जरी आपण ऐकला, तरी आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. सुमारे पन्नास हजार लोक दररोज या लंगरमध्ये जेऊन जातात. या लंगरमध्ये वाढले जाणारे अन्न शिजविणारे, वाढणारे, पेले, वाट्या, ताटे विसळणारे सर्व लोक स्वयंसेवक भाविक असतात. येथे कोणत्याही कामाला कमी लेखले जात नाही. येथे येणाऱ्या भाविकांचे चपला-बूट उचलण्यापासून ते गुरुद्वाराची स्वच्छता, लंगरच्या स्वयंपाकामध्ये मदत करणे, वाढणे, लोकांची उष्टी ताटे स्वच्छ करणे या सर्व कामांना ‘ सेवा ‘ म्हटले जाते. सर्व प्रकारची कामे इथे अतिशय प्रेमाने, भक्तिभावाने केली जातात. अश्या या लंगर विषयी आणखी थोडे जाणून घेऊ या.

लंगरमध्ये वाढले जाणारे अन्नपदार्थ अतिशय साधे, पौष्टिक आणि शाकाहारी असतात. लंगरमध्ये पोळ्या, भात, मिश्र डाळींचे वरण, भाजी आणि खीर हे अन्नपदार्थ वाढले जातात. दररोज या लंगरमध्ये जेवणाऱ्यांची संख्या पन्नास हजारांवर असते. काही सणांच्या दिवशी किंवा सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या एक लाखाचाही पुढे जाते.

सुवर्ण मंदिरामध्ये दोन प्रशस्त हॉल आहेत. या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी पाच हजार भाविक लंगर जेऊ शकतात. येथे लोक सतरंजीवर बसून लंगर जेवतात. त्यांना वाढणारेही भाविकच असतात. एक लंगर संपल्यानंतर त्वरित पुढील लंगरची तयारी सुरु होते. दररोज इतक्या भाविकांना लंगर वाढणे, किंवा तेवढे अन्न शिजविणे ही सोपी गोष्ट नाही. पण इथे काम करणारे स्वयंसेवक ‘ सेवादार ‘ अगदी घड्याळाच्या काट्याबरहुकूम सर्व जबाबदाऱ्या पार पडत असतात.

येथे काम करणाऱ्या लोकांपैकी केवळ तीनशे सेवेदार कायमस्वरूपी आहेत, बाकी सर्व लोक स्वयंसेवक भाविक असतात. हे सर्व जण मिळून लंगरचे भोजन शिजविणे, वाढणे, साफसफाई करणे ही सर्व कामे बिनबोभाट पार पाडत असतात. काही स्वयंसेवक काही तास काम करतात, तर काही जण दिवस चे दिवस इथेच मुक्काम करून असतात. येथे ‘ सेवा ‘ करण्याची इच्छा असणाऱ्याला वेळेचे बंधन नाही. ज्याने त्याने आपल्या सवडीनुसार आणि इच्छेनुसार आपली सेवा रुजू करायची असते.

लंगरचे अन्न शिजविण्याकरिता येथे दोन मोठी स्वयंपाकघरे आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून अकरा मोठमोठे तवे आहेत. या तव्यांवर एकाच वेळी असंख्य पोळ्या शेकल्या जात असतात. तसेच इथे असलेल्या अनेक शेगड्यांवरील मोठमोठ्या भांड्यांमधून भाजी, वरण, खीर बनविली जात असते. पोळ्यांसाठी लागणारी कणिक भिजविण्यासाठी येथे मोठाली मशीन्स आहेत. या लंगरसाठी लागणारा सर्व शिधा भाविकांनी दान केलेल्या पैशातून येत असतो.

सुट्टीच्या दिवशी किंवा सणावारी लंगरमध्ये जेवणाऱ्या लोकांची संख्या लाखाच्या वर असल्याने त्या दरम्यान लेबेनन येथील एका भाविकाने भेट दिलेले पोळ्या बनविणारे प्रचंड मशीन वापरले जाते. या मशीनमध्ये एकाच वेळी २५,००० पोळ्या एका तासामध्ये तयार होतात. येथील रोजच्या लंगरमध्ये जेवणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, यासाठी शिधा देखील मोठ्या प्रमाणात आणला जातो. इथे दररोज ५० क्विंटल गहू, १८ क्विंटल डाळी, १४ क्विंटल तांदूळ, आणि ७ क्विंटल दूध इतका शिधा दररोज वापरला जातो. हे अन्न शिजविण्याकरिता दररोज शंभर गॅस सिलेंडर्सची आवश्यकता असते.

या लंगरसाठी लागणारा बहुतेक शिधा दिल्लीहून किंवा स्थानिक बाजारांमधून मागविला जातो. याचा खर्च भाविकांनी दिलेल्या दानाच्या पैशामधून केला जातो. कोणी भाविक पैसे दान देतात, तर कोणी शिधा दान देणे पसंत करतात. अन्न शिजविण्यासाठी वापरली जाणारी भांडी देखील प्रचंड मोठी आहेत. या प्रत्येक भांड्यामध्ये एका वेळी ७ क्विंटल खीर किंवा वरण शिजविले जाऊ शकते. येथे स्वच्छतेला देखील खूप महत्व दिले जाते. लंगर मधील जेवणाच्या प्रत्येक पंगतीनंतर प्रत्येक ताट, वाटी, ग्लास पाच वेळा धुवून विसळला जातो.

‘सुवर्ण मंदिर‘ म्हणून ओळखला जाणारा हरमंदिर साहेब हा गुरुद्वाराच केवळ सोन्याचा नाही, तर इथे सेवा करणाऱ्या, सर्व भाविकांना अतिशय प्रेमाने जेऊ घालणाऱ्या, व पडतील ती कामे भक्तिभावाने करणाऱ्या भाविकांचे हृदय देखील सोन्याचेच म्हणावे लागेल.

Leave a Comment