घराची सजावट करताना टाळा या गोष्टी


आपल्या घरी जेव्हा कोणीही पाहुणे भेटीसाठी येतात, तेव्हा त्यांनी आपल्या घराचे, आदरातिथ्याचे, सजावटीचे केलेले कौतुक कोणाला नको असते? किंबहुना तसे कौतुक कानी पडले, की आपले घर सुंदर ठेवतानाचे आपले लहान मोठे सर्व प्रयत्न कारणी लागल्याचे समाधान आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्या घराची सजावट करताना काही लहान लहान गोष्टींचा काळजीपूर्वक केलेला विचार आपल्या घराला सुंदर बनविण्यात मदत करीत असतो. त्याकरिता सजावट करताना काही गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात.

घरामध्ये सर्वत्र आपले किंवा परिवारातील इतर सदस्यांचे फोटो लावणे टाळावे. आपल्या फोटोज मधून आपण आपल्या परिवारासोबत घालविलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी आपण जपत असतो हे जरी खरे असले, तरी घरामध्ये जिथे तिथे फोटोज् ठेवणे टाळावे. त्याऐवजी घरातील एखाद्या भिंतीवर काळजीपूर्वक निवड केलेल्या फोटोज् चा ‘ कोलाज ‘ करणे ही एक चांगली कल्पना आहे. किंवा बैठकीच्या खोलीच्या दर्शनी भागामध्ये एखादा सुंदर फोटो ठेवावा. फोटोज् चा कोलाज करताना त्यांच्या फ्रेम्स एकसारख्या असाव्यात. त्यामुळे हा कोलाज पटकन लक्ष वेधून घेणारा ठरतो.

घरामध्ये रंग करविताना आजकाल एखादी भिंत ‘ हाय लाईट ‘ करविण्याची ट्रेंड आहे. घरामधील रंगसंगती शक्यतो हलक्या रंगांची असावी. आपल्याला गडद रंग आवडत असतील तर त्यांचा वापर भिंतींसाठी न करता सोफ्याचा रंग, किंवा कुशन्स, पडदे या ठिकाणी करावा. भिंतींवर हलके रंग वापरल्याने खोली जास्त मोठी आणि प्रकाशमान दिसते. त्यामुळे घराच्या भिंतींसाठी गडद रंग वापरणे शक्यतो टाळावे. गडद रंग भिंतीवर वापरायचाच असेल, तर एखादी भिंत दर्शनी भिंत ( मेन वॉल ) गडद रंगाने हायलाईट करावी, व त्या रंगाला शोभतील अश्या हलक्या रंगाने इत भिंती रंगवून घ्याव्यात.

सध्या सजावटीच्या ज्या ट्रेंड्स चालू आहेत, त्या पैकी प्रत्येकीचे अनुसरण करणे टाळावे. अशाने तुमच्या घराचा डेकोर नक्की कसा आहे, हे समजणार नाही. आपल्या घराच्या सजावटीतून आपल्या आणि आपल्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्व सांगत असते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या विचासरणीला अनुरूप आहेत, अशाच वस्तूंनी घर सजवावे. कोणाला आधुनिक डेकोर पसंत असेल, तर कोणाला काहीसा पारंपारिक डेकोर पसंत असेल. या दोहोंचे मिश्रण जरी करावयाचे झाले, तरी ते काळजीपूर्वक करायला हवे. त्यामुळे फर्निचर आधुनिक ट्रेंडनुसार असले, तरी पारंपारिक पद्धतीने, किंवा तशा ‘थीम’ ला अनुसरून बनविली गेलेली पेंटिंग्ज, गालिचे, शोभेच्या वस्तू, यांनी जुन्या-नव्याचा उत्तम संगम साधता येऊ शकतो.

घरामध्ये अँटिक वस्तूंचे भरघोस प्रदर्शन टाळावे. जरी आपल्याकडे पारंपारिक, अँटिक वस्तू मोठ्या प्रमाणात असतील, तरी त्या सगळ्या वस्तू एकाच वेळी, एकाच ठिकाणी ठेवायलाच हव्यात असे नाही. काही वस्तू काही काळाकरिता मांडून ठेऊन, त्यानंतर त्या वस्तू आतमध्ये ठेऊन देऊन त्या जागी दुसऱ्या वस्तू मांडता येतील. असे केल्याने दर काही काळाने आपला डेकोरही बदलत राहील, आणि आपल्या घरामध्ये खूप वस्तू भरून ठेवल्या आहेत असे पाहणाऱ्याला वाटणार नाही. आपल्या घराच्या इतर डेकोर ला साजेशा वस्तूच सजावटीमध्ये वापरा. तसेच काही अँटिक पीस आपल्या डेकोरच्या थीम प्रमाणे ‘ री –डिझाईन’ सुद्धा करून घेता येतील. विशेषतः जुने, पण उत्तम प्रतीचे लाकूड वापरून बनविलेले फर्निचर, संदुका, गालिचे यांना री-डिझाईन करता येऊ शकेल.

घरामध्ये नकली, प्लास्टिक च्या फुलांचा अतिवापर काटेकोरपणाने टाळा. जर प्लास्टिकच्या फुलांचा वापर करायचाच असेल, तर तो अगदी मोजक्या प्रमाणात करावा. तसेच ही फुले दर पंधरा दिवसांनी साबणाच्या पाण्यामध्ये स्वछ धुवावीत. जर फुलांची हौस असेलच, तर ताज्या फुलांनी भरलेली फुलदाणी ठेवावी. तसेच घरामध्ये आकर्षक पद्धतीने, विचारपूर्वक केलेली फुलझाडांची किंवा शोभेच्या झाडांची मांडणी घराचे सौंदर्य अधिक खुलविते.

Leave a Comment