14 वर्ष जन्मठेप भोगल्यानंतर त्याने मिळवली एमबीबीएसची पदवी


बंगळुरू : ज्याने लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, पण आयुष्याच्या एका वळणावर त्याच्यासोबत असे काही घडले की त्याला ज्यामुळे तुरुंगात जावे लागले. एका हत्येच्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याने तब्बल 14 वर्षे तुरुगांत काढली. त्याने दरम्यानच्या काळात जे स्वप्न पाहिले होते ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पूर्ण केले. ही कहाणी कर्नाटकातील सुभाष पाटील याची आहे. त्याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एमबीबीएसची पदवी मिळवली.

तुरुंगात राहून कलबुर्गी येथे राहणाऱ्या सुभाष पाटीलने स्वप्न पूर्ण केले. डॉक्टर होऊन त्याला लोकांची सेवा करायची होती. पण एका खून प्रकरणात बंगळुरु पोलिसांनी अटक केल्यानंतर 14 वर्षांचा तुरुंगवास झाला. त्याने तुरुंगात गेल्यावर डॉक्टर होण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली. नोव्हेंबर 2002 मध्ये बंगळुरु पोलिसांनी सुभाषला अटक केली होती. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

जेव्हा सुभाषला अटक करण्यात आली होती तेव्हा तो कलबुर्गी येथील एमआर मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यानंतर त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे 2016 मध्ये सुटका झाली. त्याने सेंट्रल जेलमधील रुग्णालयात डॉक्टरांना मदत केली. त्याला 2008 मध्ये तुरुंगात असतानाच आरोग्य विभागाकडून गौरवण्यात आले होते. त्याने जेलमध्ये असतानाच पत्रकारितेचा डिप्लोमा देखील पूर्ण केला. त्यानंतर 2010 मध्ये कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आपण केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाल्यानंतर केलेल्या कष्टाच्या जोरावर येथपर्यंत पोहोचलो असल्याची भावना सुभाषने व्यक्त केली. एमबीबीएस 2019 मध्ये झाल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली. चांगल्या वागणुकीमुळे सुटका केल्याबद्दल सुभाषने राज्य सरकार आणि राज्यपालांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment