या ठिकाणी आहे सीतामाईची जन्मभूमी


फोटो सौजन्य दै,भास्कर
फाल्गुन कृष्णपक्षातील अष्टमी सीता जयंती म्हणून साजरी केली जाते. यंदा सीता जयंती १६ फेबृवारीला आहे. त्यानिमित्ताने सीतेच्या जन्मस्थळाची माहिती करून घेणे उचित ठरेल. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात पुनौरा हे गाव सीतेची जन्मभूमी मानले जाते. येथेच जानकी जन्मभूमी मंदिर असून हे मंदीर अतिशय भव्य आहे. या जागी सीता जनकाला भूमी मध्ये सापडली असा भाविकांचा विश्वास आहे.

याची कथा अशी सांगतात, मिथीला नगरीचा राजा जनक होता. एकदा येथे फार मोठा दुष्काळ पडला तेव्हा एका एका ऋषींनी जनकाला नांगर घेऊन जमीन नांगर म्हणजे पाउस होईल, पिके येतील असे सांगितले. तेव्हा जनकाने प्रथम येथे पूजा करून जमिनीवर नांगर चालविला तेव्हा या जमिनीत एका मातीच्या भांड्यात एक तान्ही मुलगी त्याला सापडली. तीच सीता. त्यामुळे येथे जानकी जन्मभूमी मंदिर बांधले गेले. या मंदिरासभोवती अनेक तीर्थस्थळे असून ती सीतेशी संबंधित आहेत.

मंदिरामागे जानकी कुंड सरोवर आहे. येथे स्नान केल्यास निपुत्रीकांना संतानप्राप्ती होते असे सांगतात. येथेच पंच पाकार नावाचे ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे सीतेचे विवाहस्थळ मानले जाते. येथे प्राचीन पिंपळ वृक्ष असून त्याखाली एक पालखी ठेवलेली आहे. जनकाने जेथे प्रथम भूमीत नांगर घातला तेथे त्याने प्रथम महादेव पूजन केले होते असे मानले जाते. येथे एक मंदिर बांधले गेले असून त्याला हलेश्वर मंदिर असे नाव आहे.

Leave a Comment