आता धूम अँटी व्हेलेंटाईन वीक ची


फोटो सौजन्य न्यूज डेक
जगात ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा उत्सव व्हेलेंटाईन डे साजरा झाल्यावर आजपासून अँटी व्हेलेंटाईन वीकच्या तयारीत प्रेमी मश्गुल झाले आहेत. हा आठवडा १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या दरम्यात एखाद्या उत्सवासारखाच साजरा होतो. प्रेमात धोका मिळालेले, ब्रेक अप झालेले लोक प्रामुख्याने त्यात सामील होत असले तरी हा आठवडा आयुष्य हे पुढे जाण्याचे दुसरे नाव आहे तेव्हा सकारात्मकतेने जुने विसरून नव्याचा शोध घ्या असा संदेश देतो.


या आठवड्यात पहिला दिवस असतो स्लॅप डे. ज्याने तुमचे हृदय तोडले त्याला थोबाडीत मारा असा याचा अर्थ असला तरी हा राग लटकेपणाने व्यक्त करायचा आहे. म्हणजे एखादी छोटीशी हलकी चापटी मारून. त्यात जोडीदार दुखावला जाता कामा नये ही काळजी घ्यायची.

दुसरा दिवस आहे किक डे. याचा अर्थ लाथ घाला असा असला तरी हा संदेश गंभीरपणे घ्यायचा नाही. तर आपल्या उदास, आळशी आयुष्याला लाथ घालून उत्साहाने पुढची वाटचाल करा असा त्याचा अर्थ. १७ फेब्रुवारीला येतो परफ्युम डे. या दिवशी प्रेमाची सकारात्मकता लक्षात घेऊन आवडीचा परफ्युम, सुगंधी मेणबत्ती, सुगंधी फुलांचा गुच्छ द्यायचं. १८ फेब्रुवारीचा दिवस आहे फ्लर्टिंग डे. अर्थात रोज फ्लर्टिंग करत बसायला वेळ कुठला? मग हा दिवस मजेदार घटनांनी साजरा करायचा.


१९ फेब्रुवारीचा दिवस आहे कन्फेशन डे. या दिवशी चुका मोकळेपणी कबुल करायच्या, या चुका हातून पुन्हा घडू देणार नाही असा निश्चय करायचा. तुम्ही कितीही दुखावले गेला असला तरी जोडीदाराला माफ करून पुढे जीवन चालू लागायचे. २० फेब्रुवारीचा दिवस आहे मिसिंग डे. एकमेकांपासून दूर असणारे हा दिवस साजरा करतात. प्रत्येक क्षण दुराव्याने कसा घालवितो हे सांगताना दुराव्याने प्रेम वाढते यावर विश्वास व्यक्त करायचा. शेवटचा म्हणजे २१ फेब्रुवारीचा दिवस आहे ब्रेक अप डे. ब्रेकअपचे दुःख कितीही गहिरे असले तरी वेळेवर आपण चुकीच्या नात्यातून बाहेर पडलो याचे समाधान वाटून घेण्याचा हा दिवस. या दिवशी हृदयाच्या आकाराचे फुगे हवेत उडवायचे आणि हृदयावरचे ओझे कमी करायचे.

Leave a Comment