तीन दिवसांचा औरंगाबाद दौरा राज ठाकरेंनी दोन दिवसात गुंडाळला


औरंगाबाद : औरंगाबादच्या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असून त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. औरंगाबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर राज ठाकरे होते. पण त्याच्या कार्यक्रमांमध्ये अचानकच बदल झाल्यामुळे तीन दिवसांचा दौरा आता केवळ दोन दिवसात गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरेंनी मुंबईतील भव्य अशा मोर्चानंतर मिशन संभाजीनगर हाती घेतले आहे. ते यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. ते तिसरा दिवसही औरंगाबादेत राहून भेटीगाठी करणार होते. पण त्यांनी अचानकच कार्यक्रमात बदल करीत आजच कार्यक्रम गुंडाळला आहे. ते उद्या पहाटे मुंबईसाठी निघणार असल्यामुळे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेशी बोलताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केले. शरद पवारांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्यांची ईव्हीएमसंदर्भात बोलण्यासाठी भेट घेतली होती. पण आमच्या मैत्रीच्या चर्चा रंगवल्या गेल्या. माझे पवारांशी चांगले संबंध असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, पक्षाचा झेंडा मी बदलला, तीच पक्षाची भूमिका आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही. मी मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप कोणताही पक्ष बोललेला नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Leave a Comment