महाराष्ट्राच्या ‘या’ दोन सुपुत्रांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आले होते वीरमरण


मुंबई – पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षी आजच्या दिवशी १४ फेब्रुवारीला आत्मघाती हल्ला केला होता. ४० जवानांना यामध्ये वीरमरण आले होते. महाराष्ट्राचे दोन सुपूत्र देखील यामध्ये धारातिर्थ पडले होते. बुलढाण्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि चोरपांगरा येथील नितीन राठोड यांना वीरमरण आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

८ मे १९७३ रोजी हुतात्मा जवान संजय राजपूत यांचा जन्म झाला होता. मलकापूरचे ते मूळचे रहिवासी होते. मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते शाळेमध्येच असताना एनसीसीचे कॅडेट होते. तेव्हापासूनच त्यांची देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढण्याची इच्छा होती. ते त्यानंतर सीआरपीएफमध्ये सामील झाले. ते सीआरपीएफ बटालियन ११५ मध्ये कार्यरत होते. ११ फेब्रुवारीला काश्मीरमध्ये त्यांना पाठवण्यात आले होते. त्यांच्या पाठीमागे २ भाऊ, एक बहिण, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. पण हल्ला झाला त्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे कुटुंब (पत्नी आणि २ मुले) नागपूरच्या ग्रुप सेंटर ऑफ सीआरपीएफच्या रहिवासी क्षेत्रात राहायला गेले होते. हल्ला झाल्याचे समजताच त्यांचे कुटुंबियांवर शोककळा पसरली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील चोरपांगरा येथील नितीन शिवाजी राठोड (वय३६) या जवानाला पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आले होते. घरची परिस्थिती अंत्यत बेताची होती. पण सैन्यात नितीन यांना भर्ती व्हायचे होते. त्यानुसार त्यांनी गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा संपूर्ण कुटुंबासह गावाला देखील अभिमान होता. पण, १४ फेब्रुवारीला हल्ला झाला आणि गावात त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच सर्वांवर शोककळा पसरली होती.

Leave a Comment