हे अ‍ॅप तुम्हाला देणार कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती

चीननंतर जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. आतापर्यंत 45 हजारांपेक्षा अधिक जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. आता चीनने एक असा मोबाईल अ‍ॅप लाँच केला आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याची माहिती मिळेल.

चीनच्या सरकारने कोरोना व्हायरसची माहिती मिळवण्यासाठी लाँच केलेल्या अ‍ॅपचे नाव ‘क्लोज कॉन्टॅक्ट डिटेक्टर’ असे नाव आहे. जर तुम्ही कोरोना व्हायरसचा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर तुम्हाला त्वरित अलर्ट मिळेल व तुम्हाला जवळील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जाईल.

या अ‍ॅपने स्वतःची तपासणी करण्यासाठी युजर्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हीचॅट सारख्या अ‍ॅपचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. नंतर मोबाईल नंबर आणि नावासह रजिस्टर्ड करावे लागेल.

हे अ‍ॅप कोणत्या आधारावर कोरोना व्हायरसची माहिती देते, याचा खुलासा चीनकडून करण्यात आलेला नाही. मात्र या अ‍ॅप्सच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फॉर्ब्सच्या रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप लोकेशनच्या आधारावर तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण आहे की नाही याची माहिती देईल.

हे अ‍ॅप तुमची हिस्ट्री तपासते. तुम्ही कोरोना व्हायरस पसरलेल्या भागात गेल्याचे समजताच हे अ‍ॅप तुम्हाला अलर्ट करते. मात्र या अ‍ॅपमुळे तुम्ही कोठे व कधी होता, याची सर्व माहिती सरकारला मिळेल.

Leave a Comment