इरिट्रियाला जाताय, मग हे नियम जाणून घ्या


फोटो सौजन्य कॅच न्यूज
प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदेकानून असतात आणि त्या त्या देशाच्या नागरिकांना ते पाळावे लागतात. अर्थात काही देशांचे कायदे विचित्र या कॅटेगरीत येतात. आफ्रिकन देश इरिट्रिया या सूचित मोडतो. या देशात टीव्ही पाहणे, मोबाईल खरेदी, सीम खरेदी यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. तसेच बँकेतून पैसे काढताना सरकारी परवानगी लागते. या देशात एकही एटीएम नाही.

हा देश पर्यटकांना सध्या आकर्षित करत आहे. मात्र येथे एकाच राजकीय पक्षाचे राज्य आहे कारण दुसरा राजकीय पक्ष स्थापन करणे बेकायदा आहे. त्यामुळे येथील सरकार मनमानी कारभार करते. नागरिकांना बँकेतून पैसे काढताना महिन्याला एका अकौंट मधून २३५०० रुपयेच काढता येतात. घरात लग्न असेल तर थोडे अधिक पैसे नागरिक काढू शकतात. त्यामुळे कार खरेदी करायची असेल तर खूप प्रतीक्षा करावी लागते.


मोबाईल अथवा सीम सरकारी परवानगी घेऊन खरेदी करता येत असले तरी इंटरनेटला परवानगी नाही. कारण सीम मध्ये मोबाईल डेटा नसतो. विदेशी पर्यटक, लोकांनाही सीमसाठी अर्ज द्यावा लागतो आणि देशातून बाहेर पडताना सीम जमा करावे लागते. देशात एरीटल हे एकच कम्युनिकेशन नेटवर्क असून ते सरकारी मालकीचे आहे. त्याची सेवा अतिशय घाणेरडी आहे. त्यामुळे लोकांना कॉल करण्यासाठी पीसीओचा वापर करावा लागतो. मीडियावर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यामुळे सरकार दाखवेल तेच टीव्ही चॅनल पहावे लागतात. वर्तमानपत्रे सरकारविरुद्ध काहीही लिहू शकत नाहीत आणि कोणतीही निदर्शने करण्यास येथे बंदी आहे.

Leave a Comment