मुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार स्वतःची घरकुले


फोटो सौजन्य इंडिया टूडे
आर्थिक राजधानी मुंबईत लाखो लोकांची जीवनरेखा म्हणून आणि जगभरात बेस्ट मॅनेजमेंट सेवा म्हणून गौरविल्या गेलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना महाराष्ट्र सरकार पंतप्रधान आवास योजनेखाली ५ हजार घरे लवकरच उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीतील हा निर्णय ट्विटरवर जाहीर केला आहे. या बैठकीला मुंबई डबावाला संघ पदाधिकारी, श्रममंत्री व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईचा डबेवाला उदयास आला तो १८९० मध्ये म्हणजे सुमारे १३० वर्षापूर्वी. त्यावेळी मुंबईत बँकर म्हणून काम करणारे महादेव बच्चे यांनी कार्यालयात घराचे जेवण मिळावे म्हणून एक डबा पोहोचविणारा माणूस नेमला. ही कल्पना अनेकांना भावली आणि त्यातून मुंबई डबेवाला व्यवसाय उदयास आला. आज या व्यवसायाची उलाढाल ४७ कोटींची असून दररोज दोन लाख मुंबईकरांना हे ५ हजार डबेवाले नियमाने, वेळेवर आणि गरमागरम घरचे जेवण पोहोचवित आहेत.

डबेवाल्यांच्या या अचूक आणि तप्तर व्यवस्थापनाचा अभ्यास जागतिक पातळीवरील तज्ञांनी केला आहे. १९१० पासून पूर्णत्वाने सुरु झालेली ही सेवा आजघडीला अतिशय विश्वासार्ह ठरली असून त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स आणि ब्रिटन राजघराण्याला या संघटनेकडून काही कारणाने दिलेल्या गिफ्ट आजही तेथील गॅलरीत विराजमान आहेत.

मुंबई डबेवाला संघटना एक रोटी बँकही चालविते. त्यात सरकार संचालित टाटा मेमोरिअल, केईएम, वाडिया या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत जेवण पुरविले जाते.

Leave a Comment