व्हर्च्युअल तंत्राने मृत मुलीला भेटू शकली आई


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
आपले जिवलग काळाच्या पडद्याआड गेले की पुन्हा त्यांना भेटणे, स्पर्श करणे, बोलणे कधीच शक्य होत नाही पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या मृत नातेवाईकांना भेटणे शक्य झाले असून कोरियातील एका टीव्ही शो मध्ये त्याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले. ‘मिटींग यु’ या नावाने झालेल्या या शोमध्ये चार वर्षापूर्वी मृत झालेल्या ७ वर्षीय मुलीला आई भेऊ शकली, तिला स्पर्श करून शकली आणि तिच्याशी बोलू शकली. यासाठी व्हर्च्युअल रीअॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.

७ वर्षाची ही मुलगी २०१६ मध्ये मरण पावली होती. तिच्या आईला टच सेन्सिटिव्ह ग्लोव्ह्ज् व ऑडीओचा वापर करून या मुलीशी बोलण्याची संधी मिळाली. आईला व्हर्च्युअल रीअॅलिटी हेडगिअर घालून बागेत नेले गेले. तेथे जांभळ्या ड्रेस मध्ये उभी असलेली आपली मृत मुलगी आईला दिसली आणि तिच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. बाहेरून हे दृश्य पाहत असलेले मुलीचे वडील, भाऊ आणि बहिण यानाही अश्रू अनावर झाले. मुलीने आईला तिला काहीही वेदना होत नसल्याचा विश्वास दिला. तुझी आठवण येते असेही सांगितले.

मुलीच्या डिजिटल रुपाजवळ जाताना आई प्रथम थोडी भांबावली पण नंतर तिने मुलीचा हात पकडला आणि स्पर्श सुख अनुभवले. मूनहवा ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने मृत मुलीचा चेहरा, शरीर, आवाज डिझाईन करताना खूप मेहनत घेतली त्यामुळे मुलगी ओरिजिनल स्वरुपात आईला भेटू शकली. शेवटी मुलीने आईला ती थकली आहे आणि तिला झोपायचे आहे असे सांगून निरोप घेतला.
———–

Leave a Comment