या रहस्यमयी बेटावर वर्षातून एकच दिवस जाण्याची परवानगी


फोटो सौजन्य बीबीसी
जगात पर्यटकांना अनेक बेटे भुरळ घालत असतात. अनेक बेटांच्या काही खास गोष्टी आहेत. काही बेटे नितांत सुंदर आहेत, काही अगदी ओसाड आहेत, काही बेटांवर रहस्ये आहेत तर काही बेटांवर रोमांच. स्कॉटलंड मधील आईनहेलो नावाचे बेट रहस्यमयी म्हणून प्रसिद्ध आहे. पण या बेटावर वर्षातून फक्त एकच दिवस पर्यटक जाऊ शकतात. बाकी ३६४ दिवस या बेटावर जाण्याची परवानगी दिली जात नाही.


हृदयाच्या आकाराचे हे बेट खरेच खूप सुंदर आहे. आकाराने ते खुपच लहान म्हणजे अवघे ७५ हेक्टर असून नकाशावर ते शोधणे हे सुद्धा जिकीरीचे काम आहे. या बेटावर भूत प्रेतांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. बेटावर कुणी जायचा प्रयत्न केलाच तर ही भुते संबंधित माणसाला हवेतच गायब करून टाकतात असेही सांगितले जाते.


स्कॉटलंडच्या हायलंडस विद्यापीठातील प्रोफेसर डेन ली सांगतात हजारो वर्षापूर्वी या बेटांवर वस्ती होती. १८५१ मध्ये प्लेगची साथ आली तेव्हा येथील रहिवासी मरणाच्या भीतीने बेट सोडून गेले. त्यामुळे हे बेट ओसाड बनले. येथे आजही अनेक जुन्या इमारतींचे सांगाडे आहेत तसेच उत्खननात पाषाणयुगीन भिंती मिळाल्या आहेत त्यावरून पूर्वी हे शहर असावे असे मानले जाते.

ओर्कने आणि रोसाय या दोन बेटांच्या मध्ये हे बेट आहे. दरवर्षी ओर्कने मधून जुलै महिन्यात एक दिवस या बेटावर जाण्यासाठी पर्यटकांना एक दिवस नेले जाते. नदीत असलेल्या या बेटावर नावेतून जावे लागते आणि नदीचे पाणी सतत कमी जास्त होत असल्याने नावा नेणे कौशल्याचे काम बनते. ओर्केने हेरिटेज सोसायटी ही सहल आयोजित करते.