न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टने घेतली केजरीवालांच्या विजयाची दखल


नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅटट्रीक केली आहे. आपने ७० पैकी तब्बल ६२ जागा जिंकल्यामुळे आपच्या या विजयाची दखल जगभरातील आघाडीच्या माध्यमांनी घेतली आहे.

जगातील प्रमुख माध्यमांनी नरेंद्र मोदींच्या भाजपसाठी हा मोठा झटका असल्याचे वर्णन केले आहे. गार्डीयनने आपल्या बातमीला मोदी यांच्या पक्षाचा प्रचाराचे ध्रुवीकरण केल्यानंतर दिल्लीत पराभव, असे हेडींग दिले आहे. भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्यातील महत्वाच्या निवडणुकीत मोठया पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाला दिल्लीच्या जनतेची मते मोठया प्रमाणावर ध्रुवीकरण करुनही मिळाली नसल्याचे गार्डीयनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या बातमीला मोदींच्या पक्षाला दिल्ली निवडणुकीत झटका, शीर्षक दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीला हिंदू बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक असा रंग देण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण यात आम आदमी पक्षाने बाजी मारली. भाजपने दिल्लीशी संबंधित स्थानिक मुद्दांऐवजी सांप्रदायिकता, नागरीकत्व कायदा आणि हिंदुंशी संबंधित मुद्दांवर भर देण्याची रणनिती आखल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

द वॉशिंग्टन पोस्टने भाजपच्या पराभवाचे वर्णन करताना मोदींच्या पक्षाचा दिल्ली निवडणुकीत धक्कादायक पराभव, असे शीर्षक दिले आहे. आप या स्थानिक पक्षाने मोदींच्या भाजपचा दारुण पराभव केला. इलेक्ट्रिसिटी, शालेय शिक्षण, गरीबांसाठी धोरणे या मुद्दांभोवती आपचा प्रचार केंद्रीत होता,असे वॉशिंग्टन पोस्टने बातमीमध्ये लिहीले आहे.

Leave a Comment