व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यास सहन करणार नाही – बजरंग दल


हैदराबाद – आपल्या देशात दरवेळेस प्रेमाचा आठवडा सुरु होताच येथील संस्कृती रक्षक बजरंग दल त्याला विरोध करण्यास हातामध्ये काठी घेऊन तयार असतात. जगभरात शुक्रवारी प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. पण पुन्हा बजरंग दल व्हेलेंटाईन डेला विरोध करत रस्त्यावर उतरले आहे. परदेशी संस्कृती स्वीकारून व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यास ते सहन केले जाणार नाही, असे म्हटले आहे.

व्हॅलेंटाईन डे साजरा करु नका, असे युवकांना तेलंगणामधील बजरंग दल संघटनेने सांगितले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पुलवामा हल्ल्यांमध्ये 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यामुळे 14 फेब्रुवारी हा वीर जवान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस महासंचालकांची बजरंग दलाचे सहसंयोजक सुभाष चंदर यांनी भेट घेतली. हैदराबाद शहरामध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त कोणताच कार्यक्रम साजरा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

प्रेमाच्या विरोधात आम्ही नसून संस्कृती रक्षक आहोत. पण हॉटेल आणि मॉलमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. व्हॅलेंटाईन डे जर कोणीही साजरा केला. तर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही तो आयोजित कार्यक्रम थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असे चंदर म्हणाले.

व्हॅलेंटाईन डे युवकांनी साजरा करायला नाही पाहिजे. कारण, ती आपली संस्कृती नाही. त्याऐवजी आपण जवानांना श्रद्धांजली द्यायला हवी, असे विश्व हिंदू परिषदेचे हैदराबाद शाखेचे अध्यक्ष श्रीनिवास रानू यांनी म्हटले आहे. लोकशाही असलेल्या आपल्या या देशामध्ये कोणत्याच व्यक्तीला कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही. जर कोणालाही काही अडचण आली तर त्यासंबधी पोलिसांना संपर्क साधायला हवा, असे हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment