या ठिकाणी चक्क ‘स्पायडर मॅन’ करतो कचरा साफ

इंडोनेशियाच्या एका कॅफेमध्ये काम करणारा रुडी हार्टोनो आपल्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लहानशा समुदायाला रस्त्यावर आणि समुद्राच्या किनारी पसरलेला कचरा साफ करण्यास प्रेरित करत असे. मात्र त्यात त्याला काही विशेष यश मिळाले नाही. अखेर यावर उपाय म्हणून त्याने भन्नाट कल्पना शोधली. त्याने चक्क स्पायडर-मॅन सारखा वेश करून कचरा साफ करण्यास सुरूवात केली व लोकांचे लक्ष स्वतःकडे खेचले.

36 वर्षीय हार्टोनोने सांगितले की, आधी मी विना पोशाख हेच कार्य करत होतो. मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मात्र स्पायडर मॅनसारखा पोशाख घातल्यानंतर लोकांचा मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय होता.

इंडोनेशियामधील अनेक भागात कचरा गोळा करण्यासाठी विशेष सार्वजनिक सुविधा नाही. प्लास्टिक कचरा हा नदी आणि समुद्रात जाऊन मिसळतो. इंडोनेशिया हा जगातील चौथा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश असून, येथे वर्षाला 3.2 मिलियन टन कचरा जमा होतो व यातील अर्धा कचरा समुद्रात मिसळतो.

हार्टोनो कॅफेच्या कामाला जाण्याआधी सकाळी 7 वाजता कचरा जमा करण्यास सुरुवात करतो. त्याच्या या कामगिरीमुळे कचऱ्याची समस्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

त्याने स्पायडर मॅनच्या पोशाखात आपला उद्देश समजून सांगण्यासाठी अनेक वृत्तपत्र आणि टिव्ही चॅनेल्सला मुलाखती दिल्या आहेत. त्याने सांगितले की, त्याने हा पोशाख आपल्या भाचाची करमणूक करण्यासाठी आणला होता.

हार्टोनो म्हणाला की, मला आशा आहे की सरकार कचरा नष्ट करण्यासाठी अजून सखोल पावले उचलेल. तसेच सिंगल यूज प्लास्टिकवर देखील काही कडक नियम लादेल. प्लास्टिक कचऱ्याचा खूप कमी वापर करणे हे महत्त्वाचे आहे. कारण प्लास्टिकचे विघटन करणे अवघड आहे.

Leave a Comment