प्रेग्नन्सीशी निगडीत काही तथ्ये


महिला गर्भारशी झाली की तिला निरनिराळ्या बाबतीत निरनिराळे सल्ले दिले जातात. अगदी काय खावे, काय प्यावे इथपासून ते कसे उठावे, कसे झोपावे इथपर्यंत सर्व सल्ल्यांचा तिच्यावर भडीमार होत असतो. पण अश्या वेळी कोणता सल्ला योग्य किंवा अयोग्य हे ठरविताना त्या महिलेची मात्र तारांबळ उडत असते. कारण सल्ला देणारी प्रत्येक व्यक्ती आपापल्या माहितीनुसार व आपल्याला आलेल्या अनुभवांच्या आधारावर सल्ले देत असते. त्यामुळे गर्भारशी महिलेला, गर्भावस्थेशी निगडीत काही तथ्यांची माहिती असणे आवश्यक आहे.

गर्भारपणामध्ये महिलेच्या पोटाचा आकार पाहून मुलगा होणार आहे किंवा मुलगी हे कळून येते, ही समजूत चुकीची आहे. तसेच पोट खाली झुकले असेल, तर मुलगा होणार आणि वर उचलले गेले असेल तर मुलगी होणार ही समजूतही चुकीची आहे. पोटाचा आकार, गर्भारशी महिलेच्या शरीराची ठेवण, पोटावरील चरबी, स्नायू आणि गर्भाशयामध्ये असलेल्या बाळाच्या पोझिशन वर अवलंबून असतो. तसेच प्रेग्नन्सी पहिलीच आहे किंवा आधीही प्रेग्नन्सी झाली आहे, यावरही पोटाचा आकार काही प्रमाणात अवलंबून असतो. जर महिला पहिल्यांदाच गर्भारशी असेल, पोटाचा आकार कमी दिसण्याची शक्यता असते. दुसऱ्या वेळेला त्याच महिलेच्या पोटाचा आकार गर्भावस्थेत जास्त मोठा दिसू शकतो. त्याचप्रमाणे गर्भारशी महिलेच्या चेहऱ्यावरील तेज किंवा ‘ ग्लो ‘ वरून मुलगा होणार किंवा मुलगी हे सांगता येऊ शकत नाही. चेहऱ्यावरील ‘ ग्लो ‘चा संबंध महिलेच्या आहाराशी आणि आरोग्याशी असतो. जर आहार आणि शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर गर्भारशी महिलेचा चेहरा आपोआपच तजेलदार दिसेल. त्यावरून होणाऱ्या बाळाचे लिंग सांगता येऊ शकते ही मात्र चुकीची समजूत आहे.

जर गर्भारशी महिलेच्या छातीत जळजळत असेल, तर होणाऱ्या मुलाचे केस खूप दाट असतात असा ही एक गैरसमज आहे. यामध्ये कोणते ही तथ्य नाही. गर्भावस्थेत पोटात किंवा छातीमध्ये जळजळ ही अतिशय सामान्य बाब आहे. या अवस्थेमध्ये पोटातील अन्न आणि अॅसिड्स अन्ननलिकेकडे सरकतात, व त्यामुळे ही जळजळ झाल्याची भावना होते. तसेच गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये उलट्या होणे ही देखील सामान्यपणे दिसून येणारी बाब आहे. त्यामुळे उलट्या होत असतील तर पोटातील बाळाला अपुरे पोषण मिळत आहे असे समजण्याचे कारण नाही. जर या उलट्यांमुळे गर्भारशी महिलेचे वजन कमी होत नसेल, किंवा तिला डीहायड्रेशन होत नसेल, तर या बाबतीत फार काळजी घेण्याची आवश्यकता नसते. मात्र जर प्रमाणाबाहेर उलट्या होऊ लागल्या, किंवा वजन जलद गतीने घटू लागले, तर मात्र ताबडतोब वैद्यकीय उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गर्भावस्थेत महिलेने शारीरक संबंध संपूर्णपणे टाळायला हवेत या गोष्टीला कोणताही वैद्यकीय आधार नसला, तरी काही बाबतीत डॉक्टर तसा सल्ला गर्भारशी महिलेला देऊ शकतात. जर बाळची नाळ खूप खाली असेल, किंवा गर्भाशयातून काही कारणाने रक्तस्राव झाला असेल, तर शारीरिक संबंध टाळण्याचा सल्ला दिला जातो. व्यायाम करण्याने पोटातील बाळाला इजा होते हा ही समज चुकीचा आहे. उलट गर्भावस्थेत मनावरील, शरीरावरील ताण हलका करणारा व्यायाम जरूर घ्यावयास हवा.

गर्भावस्थेत विमानप्रवास टाळायला हवा ही चुकीची समजूत आहे. डीलिव्हरीसाठी कमीतकमी सहा आठवडे बाकी असेपर्यंत विमानप्रवास केला जाऊ शकतो. तसेच गर्भारशी महिलांनी कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनचा वापर केल्याने बाळावर दुष्परिणाम होतात हा समजही अगदी चुकीचा आहे. पण कॉम्प्युटरवर काम करताना मात्र गर्भारशी महिलांनी त्याचा ताण आपल्या पाठीच्या कण्यावर येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. या करिता थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घ्यावी, आपल्या खुर्चीमधून उठून थोडे पायी फिरून यावे. प्रेग्नंट महिलांनी कॉफी पिऊ नये हा ही एक गैसमजच. कोणतेही खाणेपिणे प्रमाणात असले, की त्याचा त्रास होत नाही. मात्र खाण्यापिण्याची वेळ आणि मात्रा यावर नियंत्रण ठेवावे. मद्यपान आणि धूम्रपान मात्र गर्भावस्थेत शक्यतो महिलांनी टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment