जर नातेसंबंध टिकवायचे असतील, तर या सवयी टाळा


या जगामध्ये कोणत्याही दोन व्यक्तींमधील नाते हे संपूर्णपणे परफेक्ट मानता येणार नाही. कारण माणूस म्हटला, की त्याच्यात काही गुण किंवा अवगुण हे आलेच. कोणतेही नाते वरवर कितीही परफेक्ट वाटले, तरी ते तसे असेलच असे नाही. आणि ते तसे नसण्यातच खरी मजा आहे, कारण नात्यामध्ये काही कमी, काही जास्त असल्याशिवाय त्या नात्याची गोडी टिकून रहात नाही. विशेषतः पती पत्नी किंवा दोन प्रेमी जीवांचे नाते हे काहीसे नाजूकच म्हणावे लागेल. या नात्यामध्ये दोघेही स्वभावाने अगदी भिन्न असले, तर मामला अजूनच बिकट होण्याची शक्यता असते. कारण दोन जणांच्या कोणत्याही नात्यामध्ये एक व्यक्ती दुसरीपेक्षा अधिक वरचढ असते. आणि मग ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न सुरु करते, आणि इथेच सगळे बिनसते. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या सततच्या मानसिक दबावामुळे प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ लागतो आणि काही वेळेला तर संबंध संपुष्टात यायची वेळही येऊन ठेपते. त्यामुळे आपले नाते जपायचे असेल, तर काही गोष्टींचा विचार करणे अगत्याचे आहे.

सतत काही ना काही कारणांनी आपल्या जोडीदाराच्या सवयींमध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये चुका काढणे, त्याला कमी लेखणे टाळायला हवे. आपल्या जोडीदाराने आपण म्हणतो तसेच राहायला हवे किंवा वागायला हवे हा आग्रह टाळायला हवा. आपल्या जोडीदाराला स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचीही अनेक बाबतीत आपल्यापेक्षा निराळी मते असू शकतात हे समजून घ्या. जर दोघेही आपले विचार एकमेकांवर सतत लादत राहिले, तर त्या विचारांचे ओझे वाटायला लागते. अश्या जोडप्यांमध्ये एकमेकांविषयी वाटणारा आदर कमी होताना आढळतो. त्यामुळे जोडीदाराच्या विचारांचे ओझे झुगारून देऊन नात्यातून बाहेर पडण्याची भावना अधिक तीव्र होऊ लागते.

चारचौघांमध्ये आपल्या जोडीदाराची कोणत्याही कारणाने टिंगल करणे टाळा. असे करून तुम्ही इतरांनाही आपल्या जोडीदाराची टिंगल करण्यास प्रवृत्त करीत असता. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या हातून नकळत घडलेल्या एखाद्या चुकीची थट्टा परीवारारतील इतर सदस्य किंवा मित्रमंडळींसमोर करणे टाळा. तसेच आपला जोडीदार करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले देणे टाळा. त्याने काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावेत, किती पैसे कसे खर्च करावेत या बाबतीतले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या दोन्ही लोकांना असले पाहिजे. आपल्या जोडीदाराने कोणाशी मैत्री करावी किंवा करु नये याचे निर्णयही त्याला घेऊ द्यावेत.

प्रत्येक वेळी आपल्या जोडीदाराला बरे वाटावे म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागत राहणे आणि आपण सतत त्याग करतो आहोत हे दाखवून देणे ही रिलेशनशिप तुटण्यामागचे कारण आहे. अश्या वागण्याने तुम्हाला तुमचे काही मतच नाही अशी भावना जोडीदाराच्या मनामध्ये निर्माण होते. तसेच सतत आपल्यासाठी कोणीतरी त्याग करीत आहे, मन मारीत आहे, आपल्या इच्छांवर पाणी सोडीत आहे, ही भावना देखील अस्वस्थ करणारी असते. नात्यामध्ये दोघांच्याही मतांचा, इच्छांचा बरोबरीने विचार व्हायला हवा. आपले संबंध जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्याकरिता दोघांनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जोडीदाराच्या इच्छा, मते, विचार दोघांनीही समजून घ्यायला हवेत. तसेच आपल्याला खटकणाऱ्या गोष्टींबद्दलही दोघांनी समजुतीने आपापसात चर्चा करावयास हवी.

एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की त्याचा दोष आपल्या जोडीदाराला देण्याकडे काहींचा कल असतो. अश्या वेळी आरोप प्रत्यारोप सुरु होतात, आणि कोण बरोबर, कोण चूक हे दाखवून देण्याची चढाओढ सुरु होते. परिणामी, एकमेकांवर आगपाखड, धमक्या देणे, जुन्या गोष्टी उकरून काढणे, जोडीदाराच्या परिवारातील सदस्यांबद्दल उपरोधात्मक बोलणे या सर्व प्रकारांनी भांडण वाढतच जाते. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नसली, तरी त्यामागील कारणांचा शांतपणे विचार करा. आवश्यकता असल्यास घरातील थोरांचा सल्ला घ्या. आपल्या जोडीदाराची, इतरांच्या जोडीदारांशी तुलना करणे आवर्जून टाळा. रंगरूप, आर्थिक प्राप्ती, वागण्या-बोलण्याच्या सवयी, शिक्षण या बाबतीत आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करून त्याला कमी लेखू नका.

सर्व बाबतीत आपल्या जोडीदाराशी संभाषणाचा मार्ग नेहमी मोकळा ठेवा. रिलेशनशिप मध्ये मतभेद होतात, वाद ही होतात. पण अशी कोणतीही अडचण नाही ज्यातून संभाषणाद्वारे मार्ग निघत नाही. त्यामुळे एकमेकांशी संभाषण साधा. एकमेकांचे विचार, मते जाणून घ्या. तसेच लहान मोठे निर्णय घेतना त्याबाद्दल बोलून मग योग्य तो निर्णय घ्या.

Leave a Comment