25 दिवसांपासून हार्दिक पटेल बेपत्ता


गांधीनगर : 18 जानेवारीपासून गुजरात काँग्रेसचे नेते आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचा दावा त्यांची पत्नी किंजल यांनी केला आहे. 18 जानेवारीला देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आले होते, तेव्हापासून ते घरी परतलेले नाहीत.

हार्दिक पटेल यांच्याविरोधात न्यायालयाने सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे 18 जानेवारीला पटेल यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर चार दिवसांनी हार्दिक पटेल यांना जामीन देण्यात आला. पण, पाटण आणि गांधीनगर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यासंबंधी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर 24 जानेवारीला त्यांना जामीन मिळाला. पण, पुन्हा एकदा सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला. हार्दिक पटेल यांच्यावर 2015 च्या पाटीदार आरक्षण आंदोलनासंबंधित देशद्रोहाचा खटला सुरु आहे.

एका दुसऱ्या न्यायालयात हार्दिक पटेल यांचा अंतरिम जामीन अर्ज प्रलंबित असल्यामुळे जर ते येथे हजर राहिले तर त्यांना अटक होऊ शकते. म्हणून सुनावणीदरम्यान हजर राहू शकले नसल्याचे हार्दिक पटेल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. पण न्यायालयाने त्यांचा हा युक्तीवाद फेटाळून लावला होता. 20 हून अधिक खटले हार्दिक पटेलांविरोधात सुरु आहेत. यापैकी दोन देशद्रोहाशी निगडीत आहेत. त्यांनी 2015 मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व केल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

किंजल पटेल यांनी हार्दिक पटेल बेपत्ता असल्याची माहिती पाटीदार आरक्षणच्या नेत्यांकडून आयोजित एका कार्यक्रमात दिली. 18 जानेवारीला हार्दिक पटेल यांना अटक केल्यानंतर त्यांचा अद्याप संपर्क नाही. गेल्या 20 दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. आम्हाला माहीत नाही ते कुठे आहेत. पण, वारंवार येऊन पोलीस आम्हाला ते कुठे आहेत अशी विचारणा करत असल्याचे किंजल यांनी सांगितले आहे.

Leave a Comment