मोदींचे ऐकत दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले: नवाब मलिक


मुंबई – दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. देशद्रोही भाजपला दिल्लीकरांनी नाकारल्याचा हल्लाबोल मलिक यांनी केला. देशद्रोह्यांना मतदान करू नका असे आवाहन प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपलाच देशद्रोही घोषित करून टाकल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.


भाजपने दिल्ली निवडणुकीत हजारो कोटी रुपये वाटल्याचा आरोपही मलिक यांनी ट्विटमधून केला आहे. धन, बल और छल हार गया, विकास और विश्वास जीता’, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचे समोर आले आहे. यात ‘आप’ला ५३ तर भाजपला १७ जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. आम आदमी पक्षाने बहुमत गाठल्याने दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली आहे. भाजप पदरी अपयश पडल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment