
मुंबई : दिल्ली निवडणूकांच्या निकालाला सुरुवात झाली असून अद्याप 70 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार आम आदमी पक्षाची सत्ता देशाच्या राजधानीत प्रस्थापित होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदाची हॅट्रीक अरविंद केजरीवाल करणार असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत. त्यातच लोकांनी आम आदमी पक्षाची सत्ता मान्य केली आहे. तर भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारल्याचे म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे. देशाच्या राजकारणाला शिवसेनेने वळण दिले आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे देशातही तेच घडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीकरांनी भाजपची जिरवली : अनिल परब
आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीमध्ये स्थापन होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. अनिल परब यांनी याबाबत बोलताना भाजपवर टीकेची झोड केली आहे. अनिल परब बोलताना म्हणाले की, जे सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झाले, त्यामुळे शिवसेनेने देशाच्या राजकारणाला वेगळे वळण दिले आहे, दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये त्याचेच परिणाम दिसून येत आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, देशद्रोहाची व्याख्या काय आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे, तसेच लोकांना ती मान्य करायला पाहिजे, देशद्रोहाची व्याख्या केवळ एका व्यक्तीने करणे, म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. ती लोकांनाही मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे हे त्यांना आज दाखवून दिले आहे.
दिल्लीत प्रचारासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते गेले होते, फक्त महाराष्ट्रातूनच नाहीतर संपूर्ण देशभरातून अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी गेले होते. तरीही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर भाजप विजय मिळवू शकला नाही. तसेच जे भाजप नेते दिल्लीत आहेत त्यांनाच लोकांनी नाकारल्याचे आम्ही मानतो. अनिल परब पुढे म्हणाले की, राजकारणात ओहोटी-भरती सुरूच असते, परंतु फक्त आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय इतर कोणीच राज्य करू शकणार नाही. हा अहंकार लोक उतरवतात.
