उद्धव ठाकरेंकडून अरविंद केजरीवालांचे अभिनंदन


मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ‘आप’च्या विजयाने जन की बात देशाला दाखवून दिल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टोला लगावला. दिल्लीकर मतदारांनी आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा फोडला, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला.

अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन. मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे. दिल्लीत तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून, मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजित करू शकले नाहीत.

विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे दिल्लीतील जनता ठामपणे उभी राहिली आणि लोकशाहीवरचा भरोसा जनतेने कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि दिल्लीकर मतदारांनी इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळाही फोडला. मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Leave a Comment