अयोध्या राममंदिराची पहिली वीट मोदींच्या हस्ते?


फोटो सौजन्य जागरण
अयोध्येतील विशाल आणि भव्य राममंदिर उभारणीची सुरवात रामनवमी किंवा हनुमान जयंतीला केली जाईल असे सांगितले जात असतानाच राममंदिराच्या गर्भगृहाची पहिली वीट पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ठेवली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. राममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे बिहार मधील एकमेव दलित ट्रस्टी कामेश्वर चौपाल यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

सोमवारी या संदर्भात चौपाल म्हणाले, मंदिर निर्माण कार्य सुरु होण्यापूर्वी गर्भगृहात विराजमान असलेली रामललाची मूर्ती धर्मशास्त्रानुसार अन्यत्र हलविली जाईल. आणि गर्भगृहाची पहिली वीट पंतप्रधानांच्या हस्ते बसविली जाईल त्यासाठी बोलणी सुरु आहेत. ९ नोव्हेंबर १९८९ मध्ये राममंदिर शिलान्यासची पहिली वीट चौपाल यांनी बसविली होती त्यावेळी वादग्रस्त जमिनीमुळे मुख्य मंदिरापासून २५० फुट दूर सिंहद्वार येथे शिलान्यास केला गेला होता. आता वाद संपला असल्याने प्रथम गर्भगृह बांधले जाईल..

दरम्यान बाबरी मशीद अॅक्शन कमिटीने पाडल्या गेलेल्या मशिदीचा मलबा त्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात बोलताना चौपाल म्हणाले, सुप्रीम कोर्टात हे मंदिर रामाचे होते हे सिद्ध झाले आहे. ते तोडून मीर बाकी याने मशीद उभारली होती. त्यामुळे येथे पडलेला मलबा हा राममंदिराचाच आहे तो परत करण्याचा प्रश्न येत नाही.

नव्या ट्रस्टची पहिली बैठक १९ फेब्रुवारीला होत असून त्यात नवीन कार्यकारी समिती, नवीन सदस्य, मंदिर नकाशा आणि मंदिर निर्माण मुहूर्त याबाबत चर्चा होणार आहे.

Leave a Comment