हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची झुंज अखेर संपली


नागपूर – सोमवारी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषद घेवून पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान, पीडितेचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच हिंगणघाटमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

३ फेब्रुवारीला (सोमवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील नांदोरी चौकात आरोपी विकी नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. हिंगणघाट या घटनेमुळे हादरून गेले होते. पीडित तरुणीवर गेल्या सात दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. पीडितेची प्रकृती घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच चिंताजनक होती. उपचारादरम्यान चार वेळा तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पीडितेचा रक्तदाब नियंत्रणात नसल्याने तिला श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर तिला व्हेंटीलेटरवर ठेवले होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रीया केल्यानंतरही तिची प्रकृती खालावतच होती. सोमवारी (दि 10) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टर तिच्यावर उपचार करत असताना सकाळी 6 वाजून 55 मिनीटांनी तिचा मृत्यू झाला.

सुप्रिया सुळे – अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात होत आहे. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

जितेंद्र आव्हाड – हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला. जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस, तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून तिला न्याय मिळेल तेव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल.

जयंत पाटील – हिंगणघाट येथील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीने होत आहे याचे दुःख वाटते. भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment