जाणून घ्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या पद्मश्री विजेते सत्यनारायण मुंदयूर यांच्याविषयी

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने अनेक सामान्य व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर केले. दुर्गम भागातील या सामान्य व्यक्तींनी असामान्य कामगिरी केली आहे. यातीलच एक नाव म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेते सत्यनारायण मुंदयूर. मुळचे केरळचे असलेले सत्यनारायण यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मुंबईमध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यनारायण हे वर्ष 1979 मध्ये आपली सरकारी नोकरी सोडून अरुणाचल प्रदेशच्या लोहित येथे स्थायिक झाले. ‘अंकल मूसा’ म्हणून ओळखले जाणाऱ्या सत्यनारायण यांना आपल्या शिक्षण क्षैत्रातील कामासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

अरुणाचल प्रदेशमधील दुर्गम भागात शिक्षणाचा आणि वाचनाचा प्रसार करण्यात सत्यनारायण यांची महत्त्वाची भूमिका आहे.

1996 पर्यंत सत्यनारायण यांनी विवेकानंद केंद्र विद्यालयात शैक्षणिक अधिकारी म्हणून काम केले. त्यावेळी त्यांनी पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरवले. 2007 मध्ये त्यांनी लोहित यूथ लायब्रेरी अभियानंतर्गत लायब्रेरीची देखील स्थापना केली. या लायब्रेरीला ‘बांबूसा लायब्रेरी’ असे नाव देण्यात आलेले आहे. त्यांनी दुर्गम भागात आतापर्यंत 13 अशा लायब्रेरी सुरु केल्या आहेत.

सत्यनारायण मूंदयूर यांना पद्मश्री घोषित झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment