सेक्रेटरी बर्ड- जगातला सर्वात मादक पक्षी


फोटो सौजन्य पांडा
सेक्रेटरी बर्ड या पक्षाचे नाव पक्षी जगतात रुची असणाऱ्या पक्षी प्रेमीना नवीन नाही मात्र बाकीच्या साठी ते फारसे परिचितही नाही. सध्या मात्र हा पक्षी एकदमच चर्चेत आला आहे. इंटरनेटवर या पक्ष्याचे फोटो ट्विटर युजर जॉर्डन ब्लॉक यांनी शेअर केले आणि इंटरनेट पब्लिक त्यावर जाम खुश झाले आहे. ७ फेब्रुवारीला केल्या गेलेल्या या ट्विटला आत्तापर्यंत दीड लाख लाइक्स, ३२ हजार रीट्वीट आणि ६१५ कॉमेंट्स असा दमदार प्रतिसाद मिळाला असून या पक्ष्याला वर्ल्ड्स सेक्सीएस्ट बर्ड अशी उपाधीही दिली गेली आहे.

दिसण्यात हा पक्षी खरोखरच एखाद्या नखरेल सेक्रेटरीपेक्षा कमी नाही. त्याचा रंग, लांबलचक पाय, विशेष प्रकारचा पिसारा आणि डोळ्याभोवतीचा आकर्षक नारिंगी रंग, त्याची ऐटदार चाल यामुळे लोकप्रिय झाला तर नवल नाही. सेक्रेटरी बर्डची उंची ९० ते १३७ सेंटीमीटर दरम्यान असते तर वजन २ ते ५ किलो दरम्यान असते. सबसहारन आफ्रिका भागात सापडणारा हा पक्षी समुद्र सपाटी पासून ३ हजार फुट उंचीवरील भाग असा कुठेही राहू शकतो. उडण्यापेक्षा जमिनीवर चालणे त्याला अधिक आवडते.


असा हा सुंदर पक्षी शिकार करण्याच्या बाबतीत मात्र एखाद्या ससाण्यासारखा क्रूर आहे. विशेषतः जमिनीवर साप दिसला की याच्या मजबूत पंजाची पकड त्याच्यावर पडलीच म्हणून समजायचे. नुसता पंजाने तो कितीही मोठा साप सहज मारू शकतो इतकी ताकद त्याच्या पंजात आहे.

हा पक्षी बहुतेक वेळा जोडीने आढळतो आणि अनेकदा त्याचे कुटुंब त्याच्यासोबत असते. तो रात्री झाडावर झोपतो आणि उजाडले की जमिनीवर येतो. स्वभावाने शांत आहे आणि क्वचितच त्याचा आवाज कानावर पडतो.

Leave a Comment