स्मार्ट पुण्याची सिस्टर सिटी बनली धरमशाला


देशातील स्मार्टसिटी प्रोजेक्ट मध्ये चांगली प्रगती केलेल्या टॉप २० शहरांनी या मोहिमेत थोडे मागे पडलेल्या शहरांना मार्गदर्शन करावे यासाठी सिस्टर सिटी प्रोजेक्ट बनविला गेला आहे. त्यात पुण्याची सिस्टर सिटी म्हणून धरमशाला निवडली गेली असून नागपूरची सिस्टर सिटी बनले आहे पोर्ट ब्लेअर. नाशिकची सिस्टर सिटी जम्मू आहे. मोदी सरकारने २०१५ मध्ये देशात किमान १०० स्मार्टसिटी बनविण्याच्या मोहिमेला सुरवात केली होती आणि त्यात पहिल्या टप्प्यात ४० शहरांची निवड केली गेली होती. त्यातील २० शहरात ही मोहीम बऱ्यापैकी वेगाने कार्यरत असून बाकी शहरे त्यामानाने थोडी मागे पडली आहेत.

या सिस्टर सिटी ठरविताना शहराच्या समानता लक्षात घेतल्या गेल्या आहेत. एका प्रदेशाची राजधानी दुसऱ्या प्रदेशाच्या राजधानीची सिस्टर सिटी बनली आहे. त्यात औद्योगिक शहरे, पहाडी शहरे, किनारपट्टीवरील शहरे, शिक्षण, धार्मिक पर्यटन या बाबीही लक्षात घेतल्या गेल्या आहेत. वाराणसीची सिस्टर सिटी अमृतसर, उदयपूर- इटानगर, सुरत- सहारनपुर, अहमदाबाद- चंदिगढ, आग्रा-पुड्डुचेरी, बडोदा- मुरादाबाद अश्या जोड्या बनल्या आहेत.

या योजनेनुसार पुढच्या आठवड्यात सिस्टर सिटी सीइओ व नॅशनल मिशन डायरेक्टर यांच्यात एक एमओयु केला जात आहे. त्यानुसार १०० दिवसात, निवडल्या गेलेल्या २० शहरांनी त्यांच्या शहराने स्मार्टसिटी मोहिमेची अंमलबजावणी कशी केली आहे, किती आणि कोणत्या सुधारणा झाल्या आहेत याचे प्रेझेंटेशन द्यायचे आहे. निवडल्या गेलेल्या सिस्टर सिटीला त्यासंदर्भात मार्गदर्शन करून या शहरांची सुधारणा वेगाने होण्याचे आव्हान त्यांना घ्यावे लागणार आहे असे समजते.

Leave a Comment