चंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार


फोटो सौजन्य झी न्यूज
अंतराळात वस्ती करण्याचे माणसाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे. अन्य ग्रहांवर मानवी वस्ती कधी होईल हे आत्ताच सांगता येणार नसले तर पृथ्वीच्या जवळ असलेल्या चंद्रावर वस्ती होण्याची घटिका फार दूर नाही असा विश्वास वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. कुठेही वस्ती करायचे तर घरे हवीत. मग त्यासाठी पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या विटा योग्य ठरतील का या प्रश्नांचे उत्तर सध्या तरी नाही असे आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांनी संयुक्त प्रयत्नातून खास विटा तयार करण्यात यश मिळविले असल्याचे समजते. वैज्ञानिकांच्या मते ज्या ग्रहावर अंतराळात वस्ती करायची असेल तेथील पदार्थापासून तयार झालेल्या विटा सर्वात योग्य पर्याय आहे. त्यानुसार इस्रो आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांनी स्पेस ब्रिक नावाने विटा तयार केल्या आहेत. त्यात लुनार सॉईल सिम्युलंटचा वापर केला गेला आहे. हा पदार्थ चंद्रावरील माती सारखा आहे. सायन्स इन्स्टिट्यूट च्या युवा वैज्ञानिकांनी ३-४ वर्षाच्या संशोधनातून तो तयार केला आहे.

या पदार्थापासून बनलेल्या विटा अतिशय मजबूत आणि टिकाऊ आहेत. अर्थात त्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशात परग्रहांवर घरे बांधण्यासाठी विटांवर संशोधन सुरु आहे मात्र इस्रोला त्यात यश मिळाले आहे. चंद्रावरच्या माती सारखी माती बनविणे हे अवघड काम होते मात्र त्यासाठी अनेक प्रयोग करून लुनार सॉईल सिम्युलंट, विशेष प्रकारचे जीवाणू आणि गवारगमचा वापर केला गेला आणि बायोसिमेंटेशन टेक्नोलोजीने या विटा तयार झाल्या असे समजते.

या विटा मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment