ऑटोशो मध्ये कारशेजारच्या मॉडेल्सना मिळतात इतके पैसे


फोटो सौजन्य पत्रिका
ऑटो शो मध्ये महागड्या, भविष्यातील अत्याधुनिक स्वप्नवत कार्सचे दर्शन होत असते तेव्हा दुसरीकडे या कार्सच्या शेजारी उभ्या असणाऱ्या सुंदर मॉडेल्सही चर्चेत असतात. कार्सशेजारी तासंतास एकाच पोझिशन मध्ये उभ्या राहणाऱ्या या सुंदरी किती कमाई करत असतील याचे विविध अंदाज बांधले जात असले तरी प्रत्यक्षातली परिस्थिती खुपच वेगळी असते असे दिसून आले आहे.

ग्रेटर नॉयडा येथे सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो २०२० चा १२ फेब्रुवारी शेवटचा दिवस आहे. हे प्रदर्शन ५ फेब्रुवारी पासून सुरु झाले असून या संपूर्ण काळात विविध कार मॉडेल समोर एकाच पोझमध्ये उभ्या असलेल्या मॉडेल आता थोड्या मोकळ्या होतील. त्यातील काही जणींनी दिलेली माहिती पुरेशी बोलकी आहे.

महागड्या कार साठी मॉडेल म्हणून निवड होण्यासाठी क्रू इव्हेंट होतो आणि त्यात सिलेक्ट झालेल्या मॉडेल्सना विविध कंपन्याच्या सिलेक्शन मधून पुन्हा जावे लागते. चेहऱ्यावर सतत हास्य ठेऊन दिवसातले ११ तास त्यांना एकाच पोझिशन मध्ये कार शेजारी उभे राहावे लागते. पायात उंच टाचांचे बूट आणि थंडीच्या दिवसातही शॉर्ट कपडे घालावे लागतात आणि ११ तासाच्या या अवघड सेवेसाठी दिवसाला तीन ते पाच हजार रुपये हाती पडतात.


काही मॉडेलच्या मते परदेशी मॉडेल आजकाल मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत त्यांना दिवसाला १० ते १५ हजार रुपये दिले जातात व या कामाचा अनुभव असणार्यांना दिवसाला ५ ते ६ हजार रुपये मिळतात. फॅशनची ओढ असणाऱ्या मुली प्रामुख्याने या क्षेत्रात येतात त्यात अनेकजणी चांगल्या शिकलेल्या आहेत. निवड होताना काही निकष असतात. त्यानुसार उंची किमान ५.५ हवी. शरीर डौलदार आणि सडपातळ हवे. हिंदी इंग्लिशवर प्रभुत्व हवे अशी अट असते.

दिवसभर ऐन थंडीत शॉर्ट कपडे आणि उंच टाचांचे बूट घालून ११ तास हसऱ्या चेहऱ्याने उभे राहणे यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. कंपन्या ड्रेस, खाणेपिणे, प्रवास खर्च देतात पण एकंदर हे काम जिकीरीचे ठरते असाही अनुभव या मुली सांगतात.

Leave a Comment