या सवयी दर्शवितात ‘ कन्सील्ड डिप्रेशन ‘ (लपविलेले डिप्रेशन)


डिप्रेशन हा एक मानसिक विकार असून, हा विकार कधी, कोणाला, कशा परिस्थितीत उद्भवेल हे छातीठोक पणे कोणीही सांगू शकत नाही. जर हा विकार वेळीच लक्षात आला नाही, तर तो हाताबाहेर जातो, आणि डिप्रेशनने ग्रासलेली व्यक्ती मानसिक रित्या कमकुवत होत जाते. कन्सील्ड डिप्रेशन हे अजूनच धोकादायक ठरू शकते. यामध्ये डिप्रेशन असणाऱ्या व्यक्ती आपली मनस्थिती लोकांसमोर येऊच देत नाहीत. त्यांचे वागणे बोलणे इतके सामान्य असते, की त्यांना डिप्रेशन असेल अशी शंका देखील कोणाला येत नाही. त्यामुळे अश्या व्यक्तींचे डिप्रेशन बहुतेकवेळा हाताबाहेर गेल्यावरच लक्षात येते. त्यामुळे या प्रकारच्या डिप्रेशनची लक्षणे स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये जाणवताच, वेळीच योग्य ती उपाययोजना करावयास हवी. ही आहेत कन्सील्ड डिप्रेशनची काही लक्षणे –

कन्सील्ड डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तींना अचानक, त्यांना एरवी खूप आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस वाटेनासा होतो. त्यांचा हा निरस इतका वाढतो, की त्या व्यक्ती आपल्या आवडत्या गोष्टी चक्क टाळायला लागतात. त्या व्यक्ती सतत कशाची तरी वाट बघत असल्यासारख्या दिसतात, पण ती गोष्ट नक्की कोणती आहे हे त्यांना समजत नसल्याने त्यांची मनस्थिती बिघडते.

आपले डिप्रेशन लपविण्याकरिता या व्यक्ती आपल्या जीवनशैलीमध्ये अचानक मोठे बदल करू पाहतात. कधी त्या व्यक्ती यशस्वी होतात ही, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकून रहात नाही. कारण मुळात डिप्रेशन कमी करण्यासाठी कोणतेही उपाय न केल्याने, जीवनशैलीतील अचानक केलेले बदल तात्पुरता आनंद देतात. कालांतराने डिप्रेशन परत येतेच.

कन्सील्ड डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तींना बहुतेक वेळी निद्रानाशाचा ही विकार जडतो. अश्या व्यक्तींना एक तर झोप लागताच नाही, किंवा लागली तरी ती भलत्या वेळी लागते. त्याचप्रमाणे भूक अचानक वाढणे किंवा अचानक कमी होणे, ही देखील डिप्रेशनची लक्षणे असू शकतात.

कन्सील्ड डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमी एकटे पडू की काय, किंवा आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी आपल्याला सोडून जातील अशी भीती सतत त्यांच्या मनामध्ये असते. पण त्यांच्या वागण्यातून त्यांची ही भीती कुठेही व्यक्त होत नाही. मात्र ह्या व्यक्ती सतत याच काळजीने ग्रस्त असतात. आपली भीती इतरांपाशी व्यक्त करून त्यांना इतरांना दुखवायचे नसते, त्यामुळे त्या स्वतःच्याच मनाशी कुढत बसतात.

आपल्या मनस्थिती बद्दल या व्यक्ती इच्छा असूनही बोलू शकत नाहीत. उलट आपण सदैव आनंदात आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न या व्यक्ती करीत असतात. आपल्या वागण्यातून आपली मनस्थिती लोकांना कळू नये अश्या प्रयत्नात ह्या व्यक्ती असतात.

डिप्रेशन हा ‘ मूड ‘ नसून हा एक विकार आहे हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे डिप्रेशन ची लक्षणे जाणवताच ‘ होईल काही वेळाने बरे ‘ असे म्हणून वेळ मारून न नेता, योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घेणे अगत्याचे आहे. डिप्रेशन ने ग्रासलेल्या व्यक्तीला आपल्या सहानुभूतीची गरज असते. पण कन्सील्ड डिप्रेशन असणाऱ्या व्यक्ती ही सहानुभूती नाकारू शकतात, अश्या वेळी त्यांची मनस्थिती समजून घेत आपल्या परीने त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment