सर्वाधिक काळ अवकाशात राहिलेली महिला अंतराळवीर पृथ्वीवर परतली!


वॉशिंग्टन – नव्या विश्वविक्रमाला क्रिस्टीना कोच या महिला अंतराळवीराने गवसणी घातली आहे. तब्बल अकरा महिने आंततराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून, सर्वाधिक काळ अवकाशात राहणारी महिला ती ठरली आहे. ३२८ दिवस अंतराळात राहिल्यानंतर ती गुरूवारी पृथ्वीवर परतली.

रशियन सोयूज अवकाशयान हे गुरूवारी दुपारी २.४२ च्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार) फ्लाईट इंजिनिअर क्रिस्टीना कोच हिच्यासह, रॉस्कोमॉस कंपनीचे सोयूज कमांडर अ‌ॅलेक्सँडर स्क्वोर्टसोव्ह, आणि युरोपियन अवकाश संस्थेचे लुका पार्मितानो यांना घेऊन कझाकस्तानमध्ये उतरले.

कोचने सर्वाधिक काळ अवकाशात राहणारी महिला अंतराळवीर होण्याचा मान डिसेंबर महिन्यातच पटकावला होता. हा मान याआधी ‘नासा’च्या पेगी व्हिट्सन या महिला अंतराळवीराकडे होता. तिने २०१६-१७ मध्ये २८८ दिवस अंतराळात वास्तव्य केले होते. तर, आतापर्यंत सर्वाधिक काळ अवकाशात राहिलेला अंतराळवीर स्कॉट केली याचा विक्रम मोडण्यासाठी कोचला अवघे १२ दिवस कमी पडले.

अंतराळात एवढे दिवस रहायला मिळणे हे खरोखरच सन्मानजनक आहे. पेगी ही माझा आदर्श आहे. तिने माझ्या संपूर्ण प्रवासात वेळोवेळी मला मार्गदर्शनही केले आहे. मलाही यावरून जाणीव होते आहे, की परतल्यानंतर आता पुढील अंतराळवीरांना मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी असल्याचे मत कोचने डिसेंबरमध्ये पेगीचा विक्रम मोडल्यानंतर व्यक्त केले होते.

क्रिस्टीना ही १४ मार्च २०१९ला अंतराळस्थानकावर पोहोचलेली नासाच्या इतर मोहिमांप्रमाणेच सहा महिन्यांसाठी अंतराळात वास्तव्य करणार होती. पण दीर्घकालीन अंतराळयात्रांच्या होणाऱ्या प्रभावाबाबत अधिक माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने नासाने तिचा मुक्काम वाढवला होता.

क्रिस्टीनाने या एकूण मुक्कामात पृथ्वीच्या एकूण ५,२४८ प्रदक्षिणा घातल्या. यांची एकूण लांबी ही १३९ दशलक्ष मैल होते, जी की पृथ्वीपासून चंद्रापर्यंत २९१ फेऱ्या मारण्याएवढी आहे. तिने या अकरा महिन्यांमध्ये सहा वेळा ‘स्पेसवॉक’ केला. यामध्ये एकूण ४२ तास १५ मिनिटे ती अंतराळ स्थानकाच्या बाहेर होती. यादरम्यान अंतराळस्थानकाला भेट देणाऱ्या एक डझनहून अधिक वाहनांच्या लँडिंग आणि प्रक्षेपणाची ती साक्षीदार ठरली.

अवकाशात पृथ्वी ही फिरणारा केवळ एक गोळा नसून, ती जिवंत आहे! तिची ताकद आणि सौंदर्य हे तिच्या पृष्ठभागापासून २५० मैल दूर असणाऱ्या एका विशिष्ट ठिकाणाहून मी पाहिल्याचे उद्गार कोचने काढले. मानवाचे गेल्या २० वर्षांपासून अवकाशात कायम वास्तव्य राहिले आहे. पृथ्वीवर परत आल्यानंतर, मी विचार करते आहे की अंतराळ स्थानकावर असलेले माझे मित्र आणि सहकारी आता माझ्याशिवाय काय करत असतील, असे तिने म्हटले आहे.

Leave a Comment